IND vs WI : फलंदाजी क्रमातील प्रयोग पुन्हा होणार का? | पुढारी

IND vs WI : फलंदाजी क्रमातील प्रयोग पुन्हा होणार का?

बार्बाडोस, वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारताने जिंकला. या मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल, पण पहिल्या वन डेत फलंदाजी क्रमात केलेले प्रायोगिक नाटक या वन डेतही करणार का, हा प्रश्न आहे.

पहिल्या सामन्यात चेंडूला जबरदस्त फिरकी मिळत असल्याने या खेळपट्टीचा सराव येण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने फलंदाजी क्रममध्ये बदल केला. रोहित स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला तर विराटने फलंदाजी केलीच नाही, पण इशान किशन आणि रवींद्र जडेजा वगळता इतर फलंदाजांनी तशी निराशाच केली. विजयी लक्ष्य 115 धावांचे छोटे असल्याने विजय मिळाला, पण त्यासाठी भारताने 5 विकेटस् गमावल्या.

रोहितने 19 चेंडूंत नाबाद 12 धावा करत सामना संपवला. रोहितने 12 वर्षांनंतर वन डेत सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. सातव्या स्थानावर फलंदाजी करायला शेवटच्या वेळी तो 15 जानेवारी 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरला होता. त्या सामन्यात हिटमॅनने 9 धावा केल्या होत्या आणि भारताने हा सामना एका धावेने जिंकला होता. योगायोगाची गोष्ट अशी आहे की, त्याच वर्षी टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. रोहितने जानेवारीत त्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि एप्रिलमध्ये भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. आता यावर्षी पण वर्ल्डकप असून तो भारतात होणार आहे, त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होणार का? ते पाहावे लागेल.

रोहितला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, या क्रमांकावर फलंदाजी करताना मला 12 वर्षांपूर्वीच्या पदार्पणाच्या दिवसांची आठवण झाली. रोहित म्हणाला, मला कधीच वाटलं नव्हतं की खेळपट्टी अशी खेळेल. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी सर्व काही होते. आमच्या गोलंदाजांनी त्यांना कमी धावसंख्येत रोखण्यात चांगले यश मिळाले. कुलदीप यादवने अप्रतिम कामगिरी केली. येथे आलेल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांमध्ये पुरेसा वेळ द्यायचा होता म्हणून मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलो. (IND vs WI)

पहिल्या वन डेत अर्धशतकाने सर्वांना प्रभावित करणार्‍या इशान किशनला आजच्या सामन्यात मधल्या फळीत खेळावे लागू शकते. त्यामुळे के.एल. राहुल संघात परतण्यापूर्वी आपली जागा बळकट करण्यासाठी सूर्यकुमारकडे या मालिकेतील दोनच सामने शिल्लक आहेत.

वर्ल्डकपपूर्वी भारताकडे आता 11 सामने उरले आहेत. त्यापूर्वी संघाला आपली बॅटिंग लाईनअप निश्चित करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना संघात प्रयोग आता थांबवावे लागतील, पण रोहितची मानसिकता तशी दिसत नाही. सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा आम्ही असे प्रयोग करत राहू. वेस्ट इंडिजला 115 पर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर, आम्हाला माहीत होते की आम्ही काही खेळाडूंना आजमावू शकतो. मला वाटत नाही की, आम्हाला अशा अधिक संधी मिळतील. जेव्हा मी भारताकडून पदार्पण केले तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. मला ते दिवस आठवल्याने मी खूप नॉस्टॅल्जिक झालो आहे.

Back to top button