धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार | पुढारी

धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : व्यवसायातून ओळख झालेल्या महिलेला धमकी देऊन व तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करून पैसे उकळल्याची घटना शिक्रापूर येथे घडली. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी (दि. 26) सुरज राजेभाऊ सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीडित महिलेची व्यवसायातून सूरज सावंत याच्यासोबत ओळख झाली. सूरज महिलेच्या घरी आला. त्याने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत जवळीक करून फोटो काढले. नंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत अत्याचार केला.

.भयभीत झालेल्या पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. त्यांनतर काही दिवसांनी पुन्हा सूरज महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला धमकी देत पुन्हा अत्याचार करीत व्हिडीओ काढले. मात्र, सूरज इतक्यावर थांबला नाही, तर त्याने पीडितेचे फोटो व व्हिडीओ तिच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन तिच्याकडून काही पैसेदेखील उकळले. सूरजचा जास्त त्रास होऊ लागल्याने महिला तिच्या वडिलांच्या घरी गेली. तेथे देखील सूरज वारंवार फोन करून त्रास देत होता. या वेळी महिलेने फोन उचलून ‘तू काहीही कर’ असे म्हटले असता सुरजने महिलेच्या पतीला काही मेसेज केले. त्यामुळे महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगत शिक्रापूर पोलिस ठाणे गाठले.

याबाबत पीडितेने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सूरज राजेभाऊ सावंत (सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर; मूळ रा. शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button