पुणे शहरात वर्षभरात अडीच लाख नवीन वाहनांची भर | पुढारी

पुणे शहरात वर्षभरात अडीच लाख नवीन वाहनांची भर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहनांच्या संख्येचा आकडा फुगत चालला असून, 2022 मध्ये 2 लाख 55 हजार 757 नवीन वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे जून 2023 पर्यंत एकूण 35,94, 132 वाहनांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयार केला जातो. सन 2022-23 वर्षाचा पर्यावरण अहवाल महापालिकेने बुधवारी जाहीर केला. या अहवालात शहरातील वृक्ष, पक्षी, कचरा, पाणी, वायू प्रदूषण आदी माहिती देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण सुधारण्यासंदर्भात केल्या जाणार्‍या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे.

प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, खासगी वाहनांचा वापर अद्याप कमी होताना दिसत नाही. जून 2023 पर्यंत एकूण 35 लाख 94 हजार 132 वाहनांची नोंद झाली असून, सन 2021 (1 लाख 69 हजार 552) च्या तुलनेत सन 2022 मध्ये नवीन 2 लाख 55 हजार 757 वाहनांची भर पडली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पीएमपीएलच्या एकूण 2 हजार 79 बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी 1 हजार 421 बसेस सीएनजी इंधनावर तर 458 इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

महापालिकेचा पर्यावरण अहवाल जाहीर

अहवालातील ठळक मुद्दे
शहरात प्रतिदिन 2100 ते 2200 मे.टन घनकचरा आणि 950 मे. टन ओला कचरा निर्माण होत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित.
सन 2020-21 मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर 4463.59 एमयू  इतका होता तर सन 2021-22 मध्ये वाढून 4982.89 एमयू इतका झाला. रहिवासी भागात सन 2020-21 मध्ये ऊर्जा वापर 2045 एमयू इतका होता तर सन 2021-22 मध्ये वाढून 2944 एमयू इतका झाला.
शिवाजीनगर आणि हडपसर येथे हवा प्रदूषण जास्त आढळून आले आहे.

शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक 263 प्रजाती, तर एआरएआय टेकडीवर
253, पाषाण तलाव परिसरात 236 प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत.
शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कशी व्हावी यासाठी महानगरपालिका, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व स्वयंसेवी संस्था मिळून क्लायमेट अ‍ॅक्शन सेल तयार करण्यात आला आहे.
कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाउस गॅस व वातावरण बदल या विषयावर काम करण्यासाठी व पुणे शहर कार्बन न्यूट्रल करण्याच्या दृष्टीने विविध कामे सुचवणे, शहराचा क्लायमेट अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्था मिळून पुणे शहराचा क्लायमेट अ‍ॅक्शन सेल स्थापन करण्यात आला आहे.

Back to top button