सातारा : पश्चिम भागात दरडींचा धोका; ‘इर्शाळवाडी’नंतर तरी वाई प्रशासनाला जाग येणार का? | पुढारी

सातारा : पश्चिम भागात दरडींचा धोका; ‘इर्शाळवाडी’नंतर तरी वाई प्रशासनाला जाग येणार का?

वाई; पुढारी वृत्तसेवा :  वाईच्या पश्चिम भागात असणार्‍या जोर-जांभळी खोर्‍यात 22 जुलै 2021 हा दिवस अतिवृष्टीचे मोठे संकट घेऊन आला होता. या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अख्खा डोंगर गावावर कोसळल्यामुळे अनेक घरे, माणसे, जनावरे गाडली गेली होती. या घटनेनंतर प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या. मात्र, ते तोंड देखल्याच ठरल्या आहेत. कारण या पश्चिम खोर्‍यातील डोंगरदर्‍यात होणार्‍या बेकायदा बांधकामांना प्रशासनाने दिलेले अभय, कारवाईकडे केलेली डोळेझाक या कारणांमुळे भुस्खलनाचा धोका आजही कायम आहे. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर तरी वाईच्या महसूल प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाईच्या पश्चिम भागात पुणे-मुंबई शहरातील धनदांडगे स्थानिक एजंटांना हाताशी धरून अतिशय कमी भावात नडलेल्या शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी विकत घेतात. त्यावर उत्खनन करून सपाटीकरण करण्यात येते, त्या परिसरातील झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. महसूल विभागाने हॉटेल्स बांधणे, डोंगराचे सपाटीकरण, भुसुरूंग व खोदकाम या कामांना मंजुरी दिल्यानेच वाईच्या पश्चिम भागात निसर्गाचा कोप झाला आहे. भुस्खलनन होऊन अनेक कुटूंबे उघड्यावर आल्यानंतही महसूल विभागाने यातून कोणताच बोध घेतलेला नाही. अशा बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल स्थानिक करत आहेत. अतिवृष्टीनंतर भूस्खलनाची परिस्थिती कोणामुळे व का झाली, याचा विचार दोन वर्षानंतरही झालेला नाही. यापुढे वाईच्या पश्चिम भागातील जमिनी खरेदीवर प्रशासनाने करडी नजर ठेवून गौण खनिजाचा चुकीचा वापर करणार्‍यांची गय करू नये. कोणत्याही चुकीच्या कामाला मंजुरी देऊ नये, तरच वाईच्या पश्चिम भागात माळीण, इर्शाळवाडी सारख्या दुर्घटना घडणार नाहीत.

505 हेक्टर जमिनीचे झाले होते नुकसान

2021 साली अतिवृष्टीत झालेल्या भूस्खलनामुळे 77 गावांना फटका बसला. यामध्ये 3 हजार 367 शेतकर्‍यांची 505 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. तर ओढ्यांच्या भूस्खलनामुळे 280 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. 100 हेक्टर जमिनीत गाळ साठला. 6 शाळांची पडझड झाली तर 10 अंगणवाडी इमारतीचे नुकसान झाले.

Back to top button