Monsoon fungal infections : पावसाळ्यातील बुरशीजन्‍य संसर्ग आणि सामान्‍य गैरसमज | पुढारी

Monsoon fungal infections : पावसाळ्यातील बुरशीजन्‍य संसर्ग आणि सामान्‍य गैरसमज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पावसाळा म्‍हटलं की अनेक संसर्ग व आजार हे ठरलेलच. तसेच बुरशीजन्‍य संसर्ग देखील पावसाळ्यात सामान्‍यपणे होतात. मात्र याविषयी सामान्‍यांमध्‍ये प्रमुख चार गैरसमज आहेत. ( Monsoon fungal infections )  याबाबत जाणून घेवूया

गैरसमज १ : त्‍वचासंबंधित आजारांवर घरगुती उपाय पुरेसे आहेत

बुरशीजन्‍य संसर्गांवरावर वेळेवर उपचार करणे आवश्‍यक आहे. याबाबत मुंबईतील डर्माट्री स्किन अँड हेअर क्लिनिकेच्‍या डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. प्रियल गाला सांगतात की, ”भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे देशात बुरशीजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहेत. या संसर्गांवर स्‍वत:हून औषधोपचार करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आहे. व्‍यक्‍तींनी वेळेवर औषधोपचार आणि जीवनशैलीतील उपायांबाबत माहितीसाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे, जे बुरशीजन्‍य संसर्गांवर योग्‍य उपचार करण्‍यासाठी आवश्यक आहे. घरगुती उपाय आणि स्‍वत:हून औषधोपचार करण्‍यावर अवलंबून राहू नका. तुम्‍हाला खाज सुटणाऱ्या बुरशीजन्‍य संसर्गाचा त्रास होत असेल तर त्‍वरित डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.”

गैरसमज २ : संसर्ग कमी झाला की उपचार थांबवता येऊ शकतो

बुरशीजन्य संसर्ग कमी झाला की उपचार थांबवता येतात, असा एक गैरसमज सर्वसामान्‍यांमध्‍ये असतो. याबाबत अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्स डायरेक्‍टर डॉ. अश्विनी पवार म्‍हणाल्‍या, ” योग्‍य विज्ञान-आधारित सोल्‍यूशन्‍ससह आरोग्‍याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बुरशीजन्‍य संसर्गांचा प्रभावीपणे उपचार करण्‍यासाठी व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या अँटीफंगल उपचार योजनेचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. यामध्‍ये औषधोपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे आवश्‍यक आहे. जी लक्षणे सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये कमी होण्‍यास सुरूवात झाली तरी कोर्सचे पालन करणे महत्त्वाचे आहे. उपचाराचे काटेकोरपणे पालन केल्‍यास संसर्गाचे योग्‍यरित्‍या निर्मूलन होण्‍यास मदत होऊ शकते, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आरोग्‍याचे संरक्षण करण्‍यासोबत आरोग्‍यदायी, त्रास-मुक्‍त जीवन जगता येऊ शकते.”

गैरसमज ३ : बुरशीजन्‍य संसर्ग फक्‍त उन्‍हाळ्यामध्‍ये होतात

बुरशीजन्‍य संसर्ग फक्‍त उन्‍हाळ्यामध्‍ये होतात, असा एक गैरसमज आहे. मात्र भारतासारख्‍या उष्‍णकटिबंधीय देशामध्‍ये उन्‍हाळ्यानंतर देखील आर्द्र व दमट वातावरण असलेल्‍या पावसाळ्यामध्‍ये बुरशीजन्‍य संसर्गांचे प्रमाण वाढते. तसेच, देशातील हवामानामधील विविधतेमुळे (जवळच असलेला समुद्र) विविध प्रदेशांमध्‍ये संसर्गांच्‍या प्रकारांमध्‍ये विविधता दिसून येते. टिनिया किंवा नायटा होण्‍यास कारणीभूत बुरशीची विशिष्‍ट प्रजाती टी. मेण्‍टाग्रोफाइट्स मुंबई व कोलकाता यांसारख्‍या किनारपट्टी शहरांमधील आर्द्र वातावरणामध्‍ये अधिक आढळून येते. दरम्‍यान अॅथलीटच्‍या पायांना होणारे इतर संसर्ग जसे जॉक इच व नायटा (टी.रूब्रम) दिल्‍ली, लखनौ व हैदराबाद अशा किनारपट्टी नसलेल्‍या शहरांमध्‍ये आढळून येतात.

गैरसमज ४ : फक्‍त मुलांना बुरशीजन्‍य संसर्ग होतात

सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींना बुरशीजन्‍य संसर्ग होण्‍याचा धोका आहे. सामान्‍यत: ११ ते ४० वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये संसर्गांचे प्रमाण उच्‍च आहे.भारतातील पुरूषांमध्‍ये संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्‍यांना महिलांच्‍या तुलनेत संसर्ग होण्‍याची शक्‍यता जवळपास दुप्‍पट आहे. तरूण पुरूष अधिक प्रमाणात शारीरिक व्‍यायाम करत असल्‍यामुळे घाम अधिक प्रमाणात येतो, हे संभाव्‍य कारण असू शकते. महिलांमध्‍ये कमी प्रमाण असण्‍यासाठी त्‍या डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करण्‍याबाबत संकोच करत असण्‍याचे कारण असू शकते. पण महिला व मुलांसह सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींमध्ये अशा संसर्गांच्‍या वाढत्‍या प्रमाणासह हे गैरसमज मोठ्या प्रमाणात दूर होत आहेत.

ॲथलीटच्‍या पायाला आलेला नायटा (दाद) (बुरशीजन्‍य संसर्गामुळे आलेले पुरळ) (ज्‍यामुळे खाज सुटते, खवलेयुक्‍त पुरळ येते) ते जॉक इच (लालसर व खाज सुटवणारे पुरळ, जे रिंग आकाराचे असू शकते) असे काही संसर्ग होण्‍याची शक्‍यता असते, जेथे ६१.५ टक्‍के भारतीयांना या संसर्गांचा धोका आहे. अशा संसर्गांना डर्माटोफिटोसिस म्‍हणतात. वाढ होण्‍यास केराटिनची गरज असलेला बुरशीचा समूह डर्माटोफाइट्सचा व्‍यक्‍तीचे केस, त्‍वचा किंवा नखांवर परिणाम होतो. डर्माटोफाइट्स दमट, ओलसर वातावरणामध्‍ये वाढतात आणि व्‍यक्‍ती-ते-व्‍यक्‍ती संपर्क, टॉवेल्‍स किंवा कंगवा किंवा ब्रश यांसारख्‍या वस्‍तू वापरणे, सार्वजनिक पूल्‍समध्‍ये शॉवर्स आणि अधिक प्रमाणात व्‍यायाम केल्‍यामुळे येणारा घाम अशा विविध पद्धतींच्‍या माध्‍यमातून प्रसार होतो.

आर्द्रतेमुळे बुरशी आणि जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित तक्रारी अधिक सामान्य होतात. खराब स्वच्छता आणि जास्त गर्दीचे क्षेत्र देखील अधिक प्रसारास कारणीभूत ठरू शकतात. पावसाळ्यात या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण जास्त असले तरी त्‍याबाबत अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजांना दूर करणे आणि या संसर्गांना कसे प्रतिबंधित करावे, ओळखावे, तसेच उपचार कसे करावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Monsoon fungal infections :त्‍वरित उपचार घेणे ही सर्वोत्तम खबरदारी

बुरशीजन्‍य संसर्गांचे प्रमाण वाढत आहे आणि स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी आवश्‍यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उत्तम स्‍वच्‍छता राखणे आणि बुरशीजन्‍य संसर्ग असल्‍याची शंका असल्‍यास त्‍वरित वैद्यकीय उपचार घेणे ही सर्वोत्तम खबरदारी आहे. माहिती मिळवत आणि संरक्षणात्‍मक उपचार घेत आपण या संसर्गांच्‍या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्‍याप्रती आणि स्‍वत:सोबत आपल्‍या समुदायांना आरोग्‍यदायी ठेवण्‍याप्रती योगदान देऊ शकतो.

हेही वाचा : 

 

Back to top button