युद्ध संहारकतेकडे | पुढारी

युद्ध संहारकतेकडे

युद्ध सुरू झाल्यानंतर त्यातील हल्ल्या-प्रतिहल्ल्याचा जो गदारोळ असतो तसाच किंबहुना त्याहून अधिक गदारोळ प्रसारमाध्यमांमधून व्यक्त होत असतो. युद्धाची तीव्रता त्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीच्या काळात युद्धातली सेकंदा-सेकंदाची खबर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. हळूहळू युद्ध सरावाचे आणि सवयीचे बनते. लोकांच्या संवेदना बोथट होतात आणि युद्धभूमीवर काही भीषण संहारक घडले, तरच त्याची बातमी येते. बाकी बातम्या हळूहळू कमी व्हायला लागतात. रशिया-युक्रेन युद्धाचेही तसेच झालेले दिसून येते. युद्धाला पाचशे दिवस पूर्ण झाले आणि अजूनही ते थांबायचे नाव घेत नाही. युद्धाने झालेला संहार प्रचंड मोठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार युद्धात रशियाचे सुमारे 40 ते 45 हजार सैनिक ठार झाले, दीड ते पावणे दोन लाख सैनिक जखमी झाले.

युक्रेनचे सुमारे पंधरा ते वीस हजार सैनिक ठार झाले, एक ते सव्वा लाख सैनिक जखमी झाले. दोन्हीकडील सैनिकांचे मृत्यू आणि जखमींचा आकडा पाहिल्यानंतर युद्धाच्या संहारकतेची कल्पना येऊ शकते. याशिवाय युक्रेनमधील उद्ध्वस्त झालेली शहरे आणि ती पुन्हा उभारण्याचे आव्हान वेगळेच. अलीकडेच रशियातील वॅग्नर या पुतीन यांच्या खासगी लष्कराच्या बंडानंतर रशियातील अस्वस्थता समोर आली आणि या युद्धासंदर्भात नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले. परंतु, युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्याची तीव्रता वाढतच आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्याविरोधातील आपले प्रतिहल्ले यशस्वी होतील, असा दावा करताना रशियाने काबीज केलेली आपली इंच न इंच जमीन परत मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी केलेल्या तुर्कीच्या दौर्‍याला विशेष महत्त्व आहे.

झेलेन्स्की यांनी इस्तंबूलमध्ये तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांची भेट घेतली. रशियाच्या अखंडतेचे समर्थन करणार्‍या तुर्कीच्या राष्ट्रपतींनी युक्रेन ‘नाटो’चा सदस्य बनण्यासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या द़ृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड. कारण, युद्ध सुरू होण्याच्या आधीपासून युक्रेन ‘नाटो’च्या सदस्यत्वाची मागणी करीत आहे आणि त्यांना ते अद्याप मिळालेले नाही. ते मिळाले तर त्यांच्या बाजूने ‘नाटो’च्या सैन्याची ताकद मैदानात उतरू शकते आणि ते निश्चितच रशियाला भारी पडू शकते. परंतु, त्यासंदर्भात निर्णय झाला नाही. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी युक्रेनच्या सदस्यत्वासंदर्भातील विषय उपस्थित केल्यामुळे युक्रेनच्या आशा पल्लवीत होणे स्वाभाविक आहे. अमेरिकेसारख्या युक्रेनच्या हितचिंतकांना त्यामुळे हा विषय अधिक पुढे नेणे शक्य होणार आहे.

संबंधित बातम्या

झेलेन्स्की सध्या विविध देशांचा दौरा करीत आहेत. या दौर्‍यामध्ये ते ‘नाटो’मध्ये समावेशासाठी आणि सहकारी देशांकडून अधिकाधिक शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कारण, आजघडीला रशियाशी मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची रशियाला गरज आहे. याच दरम्यान रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या पाच कमांडर्सची सुटका करण्यात आली असून त्यासाठी तुर्कीने महत्त्वाची भूमिका बजावली. युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले. गतवर्षी मारियोपोल येथे रशियन सैनिकांनी युक्रेनच्या या कमांडर्सना अटक केली होती. युद्धकैद्यांच्या अदलाबदलीअंतर्गत या कमांडर्सची सुटका झाली. त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये युक्रेनला आणण्यात आले, याची स्पष्टता झालेली नाही. कारण, करारानुसार त्यांना तुर्कीमध्येच राहणे आवश्यक होते. युद्ध संपेपर्यंत त्यांनी तुर्कीमध्ये राहणे बंधनकारक असताना त्यांच्या युक्रेनमध्ये परतण्यासंदर्भात काही कल्पना नसल्याचे सांगून रशियाकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या ‘नाटो’च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तुर्कीवर दबाव आणून त्यांना सोडवण्यात आले असावे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

युद्धाला पाचशे दिवस होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत आहेत, ज्यांची माध्यमांकडून फारशी दखल घेतली जात नाही. परंतु, दरम्यानच्या काळात आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. युक्रेनला क्लस्टर शस्त्रे देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला असून त्यामुळे युक्रेनला रशियावरील प्रतिहल्ले अधिक तीव्र करता येऊ शकतील. ही शस्त्रे प्रचंड संहारक असल्यामुळे आतापर्यंत त्यांचा पुरवठा रोखून धरला गेला होता; परंतु युक्रेनकडून सातत्याने मागणी लावून धरण्यात आल्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे. ही क्लस्टर शस्त्रे भीषण संहारक असतात. ज्यात एकाचवेळी अनेक बॉम्ब असतात. हे बॉम्ब रॉकेट, मिसाईल किंवा तोफांच्या सहाय्याने फेकता येतात. विस्तीर्ण प्रदेशात छोटे छोटे शेकडो-हजारो बॉम्ब पसरवणार्‍या या शस्त्रांची संहारकता पाहूनच जगभरातील शंभराहून अधिक देशांनी त्यावर बंदी घातली आहे.

बायडेन यांनीही त्याची कबुली दिली असून आपल्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता, असे म्हटले आहे. युक्रेनजवळची शस्त्रास्त्रे संपत आल्यामुळे त्यांना क्लस्टर शस्त्रे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात, येत्या काही दिवसांत होणार्‍या ‘नाटो’ देशांच्या बैठकीत त्यासंदर्भातील प्रश्नांना बायडेन यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. अशा प्रकारची हत्यारे मोठ्या प्रमाणावर जीवितहानीसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्याचमुळे शक्यतोवर यांचा पुरवठा रोखून धरण्यात आला होता. या शस्त्रांचा वापर फक्त स्वसंरक्षणासाठी करण्याची तसेच विदेशी भूमीवर त्यांचा वापर न करण्याची अट घालण्यात आल्याचेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कुणी किती खुलासे केले, तरी पाचशे दिवसांनंतर युद्ध अधिक संहारकतेकडे निघाल्याचीच ही लक्षणे म्हणावी लागतील. ते आणखी निकराने लढवण्याची ताकद उभय देशांमध्ये आहे. युक्रेनमागे अमेरिकेचे बळ वाढत आहे. यामुळे ते आणखी किती दिवस चालणार, हे सांगणे कठीण, तसे ते संहारक मार्गावर जाण्यापासून रोखणेही कठीण!

Back to top button