सौरभ गांगुली देणार राजीनामा ! | पुढारी

सौरभ गांगुली देणार राजीनामा !

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या बाबतीत आयपीएलच्या दोन संघांचा लिलाव पार पडल्यानंतर लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कोलकाता येथील आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनौ संघाची मालकी ७ हजार ०९० कोटींची बोली लावून जिंकली. त्यानंतर सौरभ गांगुली यांच्या बाबतीत लाभाच्या पदाचा मुद्दा चर्चेला आला.

यावर संजीव गोयंका यांनीच एक वक्तव्य करुन सौरभ गांगुली एटीके मोहन बागानचे संचालक पद सोडणार असल्याची माहिती दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘मला असे वाटते की सौरभ गांगुली मोहन बागानची सगळी पदे सोडतील. मला असे वाटते की आजच गांगुली याची घोषणा करतील. मला माफ करा मी या घोषणेतील हवा काढून घेतोय.’

हेही वाचा : 

मिळालेल्या माहितीनुसार एटीके मोहन बागानमधील सर्व पदे सोडण्याची प्रक्रिया सौरभ गांगुलींनी सुरु केली आहे. बीसीसीआयच्या संविधानानुसार ज्यावेळी फ्रेंचायजी आणि बीसीसीआयचा करार होतो. त्यावेळी बीसीसीआयमधील सदस्य किंवा त्याच्या नातेवाईक, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तीचा त्या फ्रेंचायजीशी संबंध आला तर तो लाभाच्या पदाचा विषय होतो.

यामुळे त्या व्यक्तीकडून सहभागावर, कामगिरीवर आणि कर्तव्य बजावण्याच्या बाबत दुजाभाव होण्याची शक्यता असते. म्हणून बीसीसीआयचे पदाधिकारी आयपीएलमधील फ्रेंचायजीसोबत संबंध ठेवू शकत नाहीत. गांगुली यांच्याबाबतीत यापूर्वीही लाभाच्या पदाबाबत आक्षेप घेण्यात आले होते. गांगुली त्यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि दिल्ली कॅपिटल्सचेही सल्लागार होते.

गांगुली यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्याबाबतीतही लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित झाला होता. ही तिघे बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर असताना ते आयपीएल संघाचे मेंटॉरही होते.

Back to top button