चंद्रपूर : नागभीड जिल्हानिर्मितीसाठी धडकला तहसील कार्यालयावर मोर्चा | पुढारी

चंद्रपूर : नागभीड जिल्हानिर्मितीसाठी धडकला तहसील कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  चिमूर, ब्रम्हपूरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याच्या सोईच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेल्या नागभीड तालुक्याला नवीन जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने आज (दि.१०) मोर्चा काढण्यात आला. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद करून हजारो नागरिकांनी नागभीड तहसील कार्यालयावर धडक दिली.
राज्य शासनाचे काही दिवसांपासून २२ नवीन जिल्हा निर्मिती पत्र समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. यामध्ये नवीन जिल्ह्याच्या निर्मिती मध्ये चिमूरचे नाव समाविष्ट आहे. तसेच चिमूरात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून या अंतर्गत नागभीड, सिंदेवाही, सावली व चिमूरचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यालय व चिमूर जिल्हा निर्मितीला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने नागभीड जिल्हा कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने आज (दि. १०) सोमवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. नागरिकांनी कामे बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिला. तसेच हंगाम सुरू असतानाही शेतीची कामे बंद ठेवून शेतकरी बैलबंडी घेऊन मोर्चात सहभागी झाले. नागभीडमध्ये पहिल्यांदाच मोठ्या संख्येने मोर्चा काढल्याने या मोर्चाची चर्चा सर्वत्र पहायला मिळाली.
मोर्चाचे नेतृत्व नागभीड जिल्हा कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांनी केले. नागभीड शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा नागभीड तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सरपंच संघटना, आशा संघटना,  व्यापारी संघ, वकील संघटना, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे नागभीड व तळोधी बाळापूर येथे सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
यावेळी नागभीड जिल्हा झालाच पाहिजे, नागभीडकर जागा हो विकासाचा धागा हो, मित्रहो  गावकरी ते राव न करी,  करतो आम्ही नागभीड जिल्ह्याची तयारी अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील प्रमूख मार्गाने मोर्चा तहसील कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. नागभीड शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रेल्वे जंक्शन व रेल्वे विभागाची साडेतीनशे एकर जागा उपलब्ध आहे. दळणवळणाच्या सोयीसुविधा, नैसर्गिक संपदा, घोडाझरी अभयारण्य, कोर्टाची सुसज्ज इमारत, १०० नवीन खाटाचे प्रस्तावीत रूग्णालय आहे. नागभीड हे ठिकाण ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली, व चिमूर येथील जनतेला सोयीचे होईल असे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे नागभीड जिल्हाची निर्मीती व्हावी, अशी आशा याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.  नागभीडच्या तहसीलदारांना नागभीड जिल्हा निर्मितीसाठी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली.
     
     हेही वाचलंत का ? 

Back to top button