Stock Market Closing Bell | रिलायन्सचा शेअर सुसाट, IT ची खराब कामगिरी, मार्केटमध्ये आज काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | रिलायन्सचा शेअर सुसाट, IT ची खराब कामगिरी, मार्केटमध्ये आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सुरुवातीला तेजी आणि नंतर सपाट अशी स्थिती दिसून आली. सेन्सेक्स आज ६३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६५,३४४ वर बंद झाला. तर निफ्टी २४ अंकांनी वाढून १९,३५५ वर स्थिरावला. मेटल स्टॉक्सची कामगिरी चांगली राहिली. रिलायन्स आणि अदानी एंटरप्रायझेस शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. पण आयटी शेअर्सची कामगिरी खराब राहिली. (Stock Market Closing Bell) मेटल (१.८ टक्क्यांनी वाढ) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. BSE मिडकॅप इंडेक्स ०.४५ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स ०.२५ टक्क्यांनी घसरला.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ३०० अधिक अंकांनी वाढून ६५,६०० वर गेला. तर निफ्टीने (Nifty) १९,४०० वर व्यवहार केला. बाजारातील तेजीत रिलायन्सचा शेअर आघाडीवर राहिला. (Stock Market Updates)

‘हे’ शेअर्स वाढले, ‘हे’ घसरले

सेन्सेक्स आज ६५,४८२ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने आजच्या ट्रेडिंग सत्रात ६५,६३३ पर्यंत झेप घेतली. सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.८२ टक्के वाढून २,७३८ रुपयांवर गेला. टाटा स्टील, भारती एअरटेल, सन फार्मा, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक हे शेअर्सही वाढले. तर टायटनचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर सुमारे २.८५ टक्के घसरून ३,०५५ रुपयांवर आला. एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, टीसीएस, विप्रो, मारुती, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सही घसरले. अदानी एंटरप्रायझेससह अदानी पोर्टस्, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर या शेअर्सनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट हे शेअर्स घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावर विश्वास

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावर विश्वास कायम आहे. त्यांनी जुलैमध्ये २१,९४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार सध्या भारतीय इक्विटी बाजारात फायनान्सियल, कॅपिटल गुड्स, बांधकाम आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे ते आयटीसारख्या क्षेत्रात विक्री करत आहेत. NSE डेटानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ आधारावर ७९० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली होती. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी २,९६४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. (Stock Market Closing Bell)

रिलायन्सची दमदार कामगिरी, त्यामागे ठरले ‘हे’ कारण

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअरची सोमवारच्या व्यवहारात दमदार कामगिरी राहिली. हा शेअर बीएसईवर ४.५ टक्के वाढून २,७५५ या नव्या ५२ आठवड्यांचा उच्चांकावर पोहोचला. रिलायन्सने त्यांची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स डिमर्जर करण्याची आणि नंतर त्याचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) असे नामकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी २० जुलै ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. गेल्या महिन्यात डिमर्जरला नियामक मान्यता मिळाल्यानंतर शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. RIL ने शनिवारी, ८ जुलै रोजी शेअर बाजाराला या निर्णयाची माहिती दिली होती.

टायटनचा शेअर घसरला

टायटन कंपनीचा शेअर सोमवारी NSE वर सुमारे ३ टक्क्यांपर्यंत घसरून ३,०५० रुपयांवर आला. मॉर्गन स्टॅन्ले या फर्मने या शेअरचे मानांकन कमी (डाउनग्रेड) केले आहे. यामुळे निफ्टी ५० निर्देशांकात टाटा कंपनीचा हा शेअर टॉप लूजर ठरला.

आशियाई बाजारात कमकुवत स्थिती

अमेरिकेतील महागाई दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. जपानचा निक्केई (Japan’s Nikkei share) सलग पाचव्या सत्रात घसरला. अमेरिकी शेअर बाजारातील कमकुवत स्थितीचे आशियाई बाजारात पडसाद उमटले आहेत. आज निक्केई निर्देशांक ०.६१ टक्के घसरून ३२,१८९ वर बंद झाला. निक्केईवर यास्कावा इलेक्ट्रिक स्टॉकची सर्वात खराब कामगिरी राहिली.

 हे ही वाचा :

Back to top button