कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस एकाकी; मोठे आव्हान | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस एकाकी; मोठे आव्हान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता काँग्रेस एकाकी पडली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसपुढे मोेठे आव्हान आहे. त्यामुळे मोठा संघर्ष स्पष्ट आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटांना सोबत घेऊन, मित्र पक्षांची मजबूत मोट काँग्रेसला आगामी काळात बांधावी लागणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने चांगले यश मिळवले. मात्र, एकहाती सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेसने आपल्या इतकाच मजबूत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाच्या मदतीनेच जिल्हा परिषद आणि महापालिकेत सत्तेची चव चाखली. जिल्ह्याच्या प्रशासनावर चांगली पकडही ठेवली. मात्र, आता नव्या समीकरणाने अनेक वर्षांचा हा दोस्त आता प्रमुख विरोधक बनला आहे. यामुळे काँग्रेसचा जिल्ह्यातील राजकीय तीव— संघर्ष अटळ आहे.

भाजप-शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आता जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. या ताकदीचा काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजप यांनी प्रत्येकी 14 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादीने 11 तर शिवसेनेला 10 जागा मिळाल्या होत्या. प्रारंभी भाजप-शिवसेना-जनसुराज्य आणि मित्र पक्षाची सत्ता होती. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता आली. महापालिकेतही काँग्रेसच्या 27 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 जागा होत्या. याच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेवर पाच वर्षे एकहाती सत्ता ठेवली. यामुळे सर्वाधिक 32 जागा मिळवूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते.

आता मात्र, चित्रच बदलले आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीवर अजित पवार गटाचे सध्या तरी अधिक वर्चस्व दिसत आहे. शिवसेनेतही काहींशी सारखीच परिस्थिती आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या तुलनेत सध्या काँग्रेसकडे असलेला मित्रपक्ष दुबळाच आहे, त्याला सोबत घेताना काँग्रेसला अंतर्गत मजबूत व्हावे लागणार आहे. राजकीय नाट्यानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवरील दावा मजबूत केला आहे. मात्र, उमेदवार निश्चितीपासून त्याला विजयापर्यंत नेण्याचा काँग्रेसचा मार्ग सध्या तरी खडतर आहे.

विधानसभेला विरोधकांची ताकद वाढणार

विधानसभेच्या दहा जागांपैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. विधान परिषद आणि शिक्षक मतदार संघातही काँग्रेसने बाजी मारली आहे. मात्र, यावेळी काँग्रेससोबत राष्ट्रवादी होती. येत्या विधानसभेत तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता सध्या तरी नाही. विधानसभेला विरोधकांची ताकद वाढणार आहे. यामुळे काँग्रेसने विजय मिळवलेल्या चारही मतदार संघांत काँग्रेसला कंबर कसावी लागणार आहे. तत्पूर्वी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचेही काँग्रेससमोर आव्हान आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेला संदर्भ वेगवेगळे राहणार आहेत. त्यामुळे विविध पातळीवर काँग्रेसला लढाई करावी लागणार आहे. मात्र, त्यावेळी तगडा मित्र पक्ष सोबत नसेल.

Back to top button