पुणे : पार्किंगच्‍या जागेवर व्यावसायिकांचा खो | पुढारी

पुणे : पार्किंगच्‍या जागेवर व्यावसायिकांचा खो

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर आणि विमाननगरमध्ये अनेक व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे. या व्यावसायिकांचे ग्राहक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करतात. रस्त्यावर वाहन पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

कल्याणीनगर आणि विमाननगरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपनीतील कर्मचारी जेवण्यासाठी, नाष्टा करण्यासाठी हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडे येतात. आयटीतील ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या भागामध्ये छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांनी जास्त फायद्यासाठी पार्किंगमध्ये पोटभाडेकरू ठेवले आहेत. या पार्किगमध्ये बांधकाम करून दुकानदार, मोबाईल शॉपी, चहावाले अशा विविध व्यवसायिकांना जागा भाड्याने दिली आहे. तसेच काही जणांनी पार्किंगमध्ये बांधकाम करून व्यवसायाची जागा वाढवली आहे.

या व्यावसायिकांकडे येणा-या ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. वाहने पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याने आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग सुरू करण्यात आले आहे. या पार्किंगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे कल्याणीनगर येथील मारिप्लेक्स मॉल ते सिल्वर ओक, फोर्टीलिजा सोसायटी, लॅडमार्क सोसायटी, जॉगर्स पार्क या रस्त्यावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. विमाननगरमध्ये कृष्णा हॉटेल ते सीसीडी चौक, निको गार्डन, सांबर हॉटेल गल्ली या ठिकाणी रस्त्यावर वाहने लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

इमारतीचे बांधकाम केल्यानंतर प्रत्येक व्यावसायिकासाठी दुकानासमोर पार्किंगची व्यवस्था केलेली असते. इमारतीच्या बांधकाम नकाशात ती जागा दर्शवलेली असते. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर संबंधितांना बांधकाम पूर्णत्वाचा नकाशा दिला जातो. मात्र, पूर्णत्वाचा दाखल्या घेतल्यानंतर व्यावसायिक पार्किंगमध्ये व्यवसाय सुरू करतात. पार्किंगच्या जागेवर व्यवसाय करणा-यांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम अक्ट 1966 नुसार कारवाई केली जाते. मात्र, तरीही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते.

पार्किंगची व्यवस्था नसल्याने व्यवसाय सुरू करता येत नाही. तरीही, पार्किंगशिवाय विमाननगर आणि कल्याणीनगर येथे अनेक व्यवसाय सुरू आहे. नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. मात्र, बांधकाम विभाग कागदी
घोडे नाचवते. या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याचा दावा कल्याणीनगर आणि विमाननगरमधील रहिवाशी करत आहेत.

नागरिकांची वाहने रस्त्यावर
कल्याणीनगर आणि विमाननगरमधील उच्चभ्रू सोसायटीतील अनेक फ्लॅटधारकांकडे एकापेक्षा अधिक वाहने असतात. सोसायटीमध्ये फ्लॅटधारक जे पार्किंग घेतात त्यात जागा होत नसल्याने नव्याने घेतलेली वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. महिनोन् महिने गाड्या रस्त्यावरील पार्किंगमध्ये लावलेल्या असतात. या वाहनांचा परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरत
असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

Back to top button