पुणे : मर्चंट नेव्हीत काम करणार्‍या तरुणाचे अपहरण | पुढारी

पुणे : मर्चंट नेव्हीत काम करणार्‍या तरुणाचे अपहरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देणार्‍या एजंटने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणातून चौघांनी मित्राचे अपहरण केले. पुण्यातील धनकवडी परिसरातील एका लॉजमध्ये डांबून ठेवून त्याला मारहाण केली. त्यानंतर तरुणाच्या वडिलांना फोन करून अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केली. अपहरणकर्ते बाहेर गेल्याचा फायदा घेत तरुणाने आपल्या मोबाईलवरून वडिलांना व्हॉटस्अपद्वारे त्याला डांबून ठेवलेले लोकेशन पाठवले. त्यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली. अपहृत तरुण मर्चंट नेव्हीत नोकरी करतो.

या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अभिजित राजेंद्र थोरात (वय 20, रा. कर्जत अहमदनगर), निखिल रमेश कांबळे (वय 31, रा. दत्तनगर, कात्रज), प्रथमेश अनिल पाटील (वय 22, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) व एक विधीसंघर्षीत बालक आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभिजित आणि निखिल या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सिंदखेड राजा, धुळे येथील 25 वर्षीय तरुणाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस हवालदार सचिन अहिवळे यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, कर्मचारी प्रवीण ढमाळ, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, राजेंद्र लांडगे, अमर पवार, नितीन कांबळे यांच्या पथकाने तरुणाची सुखरूप सुटका केली. पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा : 

येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार

शेअर बाजारातील तेजीची कारणमीमांसा!

Back to top button