बेळगाव : सरकारी योजनांमध्येही ‘ऑनलॉईन’ घुसखोरी | पुढारी

बेळगाव : सरकारी योजनांमध्येही ‘ऑनलॉईन’ घुसखोरी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  एखादी सरकारी योजना अंमलात आली की, ऑनलाईन भामटे त्यातून आपला कसा फायदा होईल, हेच बघतात. राज्यातील काँग्रेस सरकारने आता अंमलात आणलेल्या बहुतांश योजनांमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. याचाच फायदा उठवत भामट्यांनी बनावट अ‍ॅप, वेबसाईट, लिंक तयार केल्या आहेत. काही योजनांसाठी मोबाईल व बँक खाते क्रमांक द्यावा लागत असल्याने याद्वारे फसवण्याचा फंडा सुरू केला आहे. त्यामुळे, लोकांनी सावध राहून अर्ज करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केलेल्या आहेत, त्यापैकी गृहलक्ष्मी, युवानिधी व गृहज्योती या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे. घरातील प्रमुख महिलेच्या खात्यावर दोन हजार जमा करण्यासाठी गृहलक्ष्मी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी व 200 युनिट वीज मोफत मिळण्यासाठी गॅरंटी दिलेली गृहज्योती या तिन्ही योजनांसाठी सेवासिंधू पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. उदा. गृहज्योती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना वीज बिल, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक अपलोड करावा लागणार आहे. गृहलक्ष्मी व युवानिधी योजनेंतर्गत मासिक वेतन मिळण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील अपलोड करावा लागणार आहे. नेमका याचाच फायदा उठवण्यासाठी ऑनलाईन भामटे सज्ज झालेले आहेत.
गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन जेव्हा संबंधित अ‍ॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा भामट्यांनी तयार केलेले बनावट अ‍ॅप उघडले जाऊ शकते. यामध्ये लाभार्थी व्यक्तीने आपला सर्व तपशील भरला तर त्याच्या बँक खात्यावरील रक्कम भामटे सहजरीत्या काढून घेऊ शकतात.

आपली ऑनलाईन फसवणूक होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. अधिकृतरीत्या अर्ज भरून घेतले जात असलेल्या ठिकाणी जाऊन सर्व तपशील भरावा. आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी कुणाशीही शेअर न करता समोरील व्यक्ती ओळखीची व खात्रीची असल्याचे पाहूनच शेअर करावा. आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील कोणाही अनोळखी व्यक्तीला फोनवरुन देऊ नये. तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत, तुमचे बिल माफ केले जाणार आहे, अशा आशयाचे फोनवर कुणी सांगत असेल, त्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा फसले जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन फसवण्याची एकही संधी भामटे सोडत नाहीत. आता या योजनांचा फायदा त्यांच्याकडून उठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणीही आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नये. आपल्या बँकेची तसेच अन्य माहिती कुणाही अनोळखीला देऊ नका. खात्रीच्या व्यक्तीकडे जाऊन ऑनलाईन अर्ज भरल्यास फसवणूक टळू शकते.
– बी. आर. गड्डेकर,
पोलिस निरीक्षक, सीईएन

Back to top button