Opposition leader of congress party : राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेस झाली मोठी; आता विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे | पुढारी

Opposition leader of congress party : राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेस झाली मोठी; आता विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे

मुंबई; गौरीशंकर घाळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधिमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे विधानसभेत ४५ आमदारांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे (Congress has become the single largest party). त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आपसूकच काँग्रेसकडे जाणार असल्याचे मानले जात आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापुर्वीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विरोधी पक्षनेत्याच्या (Opposition leader of congress party) नावाची घोषणा होऊ शकते.

शिवसेनेतील बंडाळीनंतर वर्षभरापुर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यावेळी संख्याबळाच्या आधारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेतील पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले. विधानसभेत ५३ आमदारांसह राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष ठरला. तर, शिवसेनेतील बंडाळीचे लोण विधान परिषदेत न पोहचल्याने ११ आमदारांसह तिथले विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्याकडे गेले. आता राष्ट्रवादीतील बंडाळीमुळे ही सर्व समीकरणे बदलली आहे. विधानसभेत ४५ आमदारांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधून विरोधी पक्षनेते पदी कोणची वर्णी लागणार, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीवरच ही नियुक्ती होणार असली तरी संभाव्य नावांची मोठी यादी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सध्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधिमंडळ गटनेते पदाची जबाबदारी आहे. थोरात यांच्यासोबत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणुन अशोक चव्हाण तर आक्रमक प्रदेशाध्यक्ष म्हणुन नाना पटोले या तीन नेत्यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून अन्य नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर, सुनिल केदार, विजय वडेट्टीवार या नेत्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविलली जात आहे. यशोमती ठाकूर यांच्या रूपाने महिलांना विरोधी पक्षनेते पद, हा प्रयोग परिमाणकारक ठरू शकतो.

अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, याचा अद्याप अंदाज आलेला नाही. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोन-तीन दिवस वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आठवडाभरात संख्याबळाचे चित्र स्पष्ट होइल. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून नावाची घोषणा होण्याची शक्यता काँग्रेसमधील सुत्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडाळीने विधान परिषदेतील संख्याबळात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी नऊ आमदार आहेत. अजित पवारांसोबत परिषदेतील काही आमदार गेल्याने राष्ट्रवादीची संख्या खाली येणार आहे. जोडीलाच ठाकरे गटातील अन्य कुणी शिंदे गटाची वाट धरल्यास विधान परिषदेतही आठ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button