धारवाड-बंगळूर वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन; बेळगावला टाळले, लंगडे कारण पुढे केले… | पुढारी

धारवाड-बंगळूर वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन; बेळगावला टाळले, लंगडे कारण पुढे केले...

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत न धावण्यामागे लंगडे कारण देण्यात आले आहे. ही रेल्वे धारवाड-बंगळूर यादरम्यानच धावणार आहे. धारवाड-कित्तूर-बेळगाव हा नवा रेल्वे मार्ग बनल्यानंतर ती बेळगावपर्यंत धावेल, असा दावा केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. मात्र सध्याही धारवाड आणि बेळगाव लोंढामार्गे रेल्वेने जोडलेले आहेच. त्यामुळे आताही ही रेल्वे बेळगावपर्यंत धावू शकते. पण बेळगावला टाळण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून धारवाड-बंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत, मंत्री जोशी यांनी धारवाड येथे एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन केले. उच्च तंत्रतंत्रज्ञानाचा वापर करत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे देशभरात सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, वंदे भारत रेल्वे ही आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. बंगळूर शहराला रेल्वेच्या माध्यमातून जलद संपर्क साधता येणार आहे. बेळगावकरांकडून बेळगावपर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मार्गावर आवश्यक सुविधांची पूर्तता करून लवकरच बेळगावपर्यंत आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल. सध्या ही रेल्वे बंगळूरहून सकाळी सोडण्यात येईल. येथील नागरिकांकडून सकाळी धारवाडहून रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु बोगी स्वच्छतेची यंत्रणा बंगळूर येथे आहे. येत्या काळात धारवाड येथे सुविधा सुरू करण्यात येईल. यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.

Back to top button