Ashadhi Ekadashi : माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर | पुढारी

Ashadhi Ekadashi : माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर

माढा; मदन चवरे :  संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या अभंगात वर्णिलेल्या आणि स्कंद आणि पद्म पुराणातील आद्य मूर्तीची लक्षणे दाखविणार्‍या माढा शहरातील कसबा पेठेतील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ऐतिहासिक आहे. श्री विठ्ठल महोत्सव माढा शहरात भक्तिभावाने साजरा केला जातो.

माढा शहरात कसबा पेठेत असणारे हे विठ्ठल मंदिर माढ्याचे जहागीरदार राजे रावरंभा निंबाळकर यांनी बांधल्याचा उल्लेख देवळाच्या उंबरठ्याच्या कीर्ती मुखाच्या पायरीवर आढळतो. या पायरीवर ‘राव महादाजी निंबाळकर शेरणागत पांडुरंग चरणी’, असा उल्लेख आढळतो. या मूर्तीच्या हातात काठी असून हृदयावर कोरलेला श्लोक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनानुसार स्कंद पुराणातील ‘पांडुरंग महात्म्य’ यातील कूट श्लोकाशी एकरूप आहे. या मंदिराचा बहुतांश परिसर आता पडलेल्या स्वरूपात आहे. या मंदिरास सर्वत्र हिंदू मंदिरास असणार्‍या शिखराचा अभाव आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस श्री मल्लिकार्जुन देवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील शिलालेखही प्राचीनच आहे.

इतिहासकार डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या म्हणण्यानुसार माढ्यातील कसबा पेठेतील मंदिरातील ही विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती आहे. माढा येथील विठ्ठल मंदिरात मूर्ती आजही विराजमान आहे. इ.स. 1659 मध्ये अफझलखानाच्या स्वारीप्रसंगी माढा येथे पंढरपूरची विठ्ठल मूर्ती हलविली गेली होती, अशी पारंपरिक माहिती आहे. माढा येथे विठ्ठल मंदिर निंबाळकरांनी मुद्दाम बांधले. ते या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थच. या दुर्लक्षित राहिलेल्या विठ्ठल मंदिराच्या जागेची मालकी ही खासगी व्यक्तीकडे आहे. मंदिराच्या नावावर तत्कालीन जहागीरदार रावरंभा निंबाळकर यांनी रणदिवेवाडी परिसरातील 65 एकर जमीन देखभाल खर्चासाठी दिल्याचे सांगण्यात येते.

Back to top button