गोव्यात समान नागरी कायदा असल्याचा अभिमान : मुख्यमंत्री सावंत | पुढारी

गोव्यात समान नागरी कायदा असल्याचा अभिमान : मुख्यमंत्री सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गोव्यात समान नागरी कायदा असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कायद्याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, नुकत्याच एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष समान नागरी कायद्यावरून राजकारण करत आहे, अशी टीका केली होती. मी पंतप्रधानांच्या मताशी सहमत आहे. असे परखड मत व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. समान नागरी कायद्यामुळे जात- धर्म या आधारांवर भेदभाव केला जात नाही. समान नागरी कायद्यामुळे गोव्यामध्ये जन्म नोंदणी, विवाह नोंदणी, मालमत्ता अधिकार अशा विविध गोष्टींसाठी सर्व धर्माच्या लोकांना एकच कायदा आहे. नवभारताच्या निर्माणासाठी देशभर सर्वत्र समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक आहे. गोव्यात अनेक वर्षे समान नागरी कायदा लागू आहे. मात्र यामुळे येथील अल्पसंख्याक समाजाला कसलाही त्रास झालेला नाही. हा कायदा जर गोव्यात व्यवस्थितपणे अंगिकारला जात असेल तर संपूर्ण देशातही तो निश्चितपणे स्वीकारला जाईल. राजकारण केले नाही तर या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येते.

पुढील पिढीला मूळ संस्कृती समजावी

गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली तरी गोव्याची मूळ संस्कृती ही हजारो वर्षे जुनी आहे. येथे कदंब, मराठे अशा विविध शासकांनी राज्य केले. मला वाटते आता सर्वांनी वसाहती मानसिकतेतून बाहेर येऊन स्वतःची संस्कृती पुढे नेली पाहिजे. गोव्यात येणारे पर्यटक तसेच पुढच्या पिढीला गोव्याची मूळ संस्कृती समजणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

 

  हेही वाचलंत का ? 

Back to top button