पुणे : खडकवासला धरणसाखळीत किंचित भर | पुढारी

पुणे : खडकवासला धरणसाखळीत किंचित भर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा:  पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव खोर्‍यात मंगळवारी संततधार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या प्रथमच धरणसाठ्यात भर पडली आहे. गेल्या 24 तासांत चार धरणांच्या साखळीत 0.09 टीएमसी इतकी वाढ झाली. वरसगाव येथे दिवसभरात सर्वांत अधिक 58 मिलीमीटर पाऊस पडला. सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 4.25 टीएमसी म्हणजे 14.60 टक्के पाणीसाठा झाला होता. सोमवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 4.16 टीएमसी पाणीसाठा होते.

दरम्यान, खडकवासला, सिंहगड भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. रिमझिम पावसानंतर थोडी उघडीप सुरू आहे. मात्र, रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात मंगळवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 30, पानशेत येथे 55 व खडकवासला येथे 14 मिली मीटर पाऊस पडला आहे. वरसगाव धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दासवे, धामण ओहोळ, तव भागासह पानशेत खोर्‍यातील दापसरे, टेकपोळे, शिरकोली खोर्‍यात पावसाचा अधूनमधून सरी कोसळत आहेत. डोंगरकडे, ओढ्या-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत.

घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगररांगांत तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. जवळपास तीन आठवड्यांनंतर धरण क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला असून, यंदाच्या हंगामात प्रथमच पाणीसाठ्यात भर पडली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास दीड टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणसाखळीत 2.97 टीएमसी (9.47 टक्के) पाणी शिल्लक होते.

हे ही वाचा : 

Share Market News | शेअर बाजारात खरेदीची लाट, सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक

कराड : विहिरीत जीप कोसळलेल्या चालकाचा मृतदेह सापडला

Back to top button