पुण्यात आगामी सहा दिवस मुसळधार पाऊस | पुढारी

पुण्यात आगामी सहा दिवस मुसळधार पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारपासून (दि. 27) मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात 2 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, दोन दिवसांत शहरात 25 मिमी पावसाची नोंद झाली असून, जूनमध्ये एकूण 45 मिमी पाऊस झाला. शहरात 23 जूनपर्यंत 20.4 मिमी पावसाची नोंद झाली. 24 पासून मान्सून बरसण्यास सुरुवात झाली. रविवारी (दि. 25) लागोपाठ दुसर्‍या दिवशी पाऊस झाल्याने पावसाचा टक्का वाढून तो 45 मिमीवर गेला. दरम्यान, 27 जून ते 2 जुलैदरम्यान शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा जोर घाटमाथ्यावर जास्त राहणार असल्याने त्याचा परिणाम शहरात होणार आहे.

खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासालासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रविवारी पावसाचा जोर मध्यम होता. मात्र, सोमवारी पावसाचा जोर अत्यंत कमी झाला होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला 1, पानशेत 7, वरसगाव-10, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

घाटमाथ्याला 48 तास ऑरेंज अलर्ट…

सोमवारी रात्री उशिरा हवामान विभागाने घाटमाथ्याला 48 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शहरात देखील मंगळवार व बुधवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शहरासह घाटमाथ्यावर 15 ते 64 मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचा होणार सत्कार

नागपूर : पोलिसांकडून जप्त केलेल्या १२०० किलो गांजाची विल्हेवाट

कोल्हापूर : घुणकीत ईदची कुरबानी आषाढीच्या दुसऱ्या दिवशी; मुस्लिम समाजाचा निर्णय

Back to top button