नगर : कोणी शिक्षक देता का शिक्षक..! दुधोडी येथील चिमुकल्यांची हाक | पुढारी

नगर : कोणी शिक्षक देता का शिक्षक..! दुधोडी येथील चिमुकल्यांची हाक

सिद्धटेक (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे चार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे कोणी शिक्षक देता का शिक्षक, असे म्हणण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे. तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच रमेश जांभळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज जांभळे, उपाध्यक्ष नामदेव भोसले, राजेंद्र परकाळे, बळीराम जांभळे, अंकुश कोर्‍हाळे, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये शासन नियमानुसार असणारे पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे सहावी व सातवीच्या वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे . यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी मागणी केली जात आहे. तरीही कायम स्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची भावना आहे.

तालुक्यातील शेवटच्या टोकाची शाळा असून, येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. एकूण विदयार्थी संख्या एकशे बेचाळीस आहे. इतर शिक्षकांवर अध्यापन व शालेय कामकाजाचा अतिरिक्त भार पडत आहे. शाळेचे दैनंदिन कामकाज, शालेय पोषण आहार, मासिक पत्रके, सातत्याने सुरू असणारी ट्रेनिंग, यामुळे एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा परिणाम म्हणून काही पालकांनी आपली मुले शेजारील गावांमधील शाळेमध्ये पाठविल्याने याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर झाला आहे.

Back to top button