...तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही; नाचनवेल ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

...तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही; नाचनवेल ग्रामस्थ आक्रमक

नाचनवेल; पुढारी वृत्तसेवा: शिक्षकांची रिक्त जागा जो पर्यंत भरत नाहीत, तो पर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा पवित्रा नाचनवेल (ता.कन्नड) येथील ग्रामस्थांनी आज (दि.१९) घेतला. दरम्यान, कन्नडचे गटशिक्षणाधिकारी शेषराव गंडे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांना आश्वासन दिले. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते.

यावेळी शिवाजी थोरात, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र राजपूत, नरेंद्र वैद्य, किरण थोरात, रावसाहेब शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष राजपूत कैलास महाले, विकी सागर शिंदे, राजपूत विश्वनाथ थोरात, गणेश थोरात, विठ्ठल थोरात, अवधूत थोरात आदी उपस्थित होते.

नाचनवेल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पट संख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे कमी आहेत. इयत्ता पाचवी ते दहावी वर्गासाठी फक्त ७ शिक्षक आहेत. मुख्याध्यापकासह पंधरा पदे मंजूर आहेत. परंतु मुख्याध्यापकासह ८ पदे रिक्त आहेत. त्यात गणित, विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले आहे.

नाचनवेल शाळेत एकूण २७६ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. ५० टक्के पदे रिक्त असल्याने आम्ही शांततेत शाळेला कुलूप ठोकले. जर शिक्षक मिळाले नाही, तर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आमरण उपोषण करू.
-शिवाजी थोरात, नाचनवेल

मुख्य विषयाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्हाला गणित आणि विज्ञान विषयाला शिक्षक नाहीत. शिक्षक नाही मिळाले तर आम्ही इतर शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेऊ.
– गौरवी कैलास महाले (विद्यार्थिनी)

हेही वाचा 

Back to top button