Rakhi Sawant : राखी, मिका सिंगमध्ये ‘Kiss’ प्रकरणी तडजोड : मिकावरील विनयभंगाचा गुन्हा रद्द | पुढारी

Rakhi Sawant : राखी, मिका सिंगमध्ये 'Kiss' प्रकरणी तडजोड : मिकावरील विनयभंगाचा गुन्हा रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत (rakhi sawant) आणि वाद हे नेहमीचेच समीकरण बनले आहे. यातील सर्वांत गाजलेले प्रकरण म्हणजे २००६ मधील राखी सावंतने गायक मिका सिंग विरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा. मिका सिंग याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मिकाने राखी सावंतला किस केले होते. या घटनेनंतर राखीने मिका सिंग विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.

मिका सिंग (mika singh) राखी सावंतला किस करतानाचे व्हिडिओ, फोटो त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शेअर झाले होते. याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. राखी सावंतने दिलेल्या तक्रारीनुसार मिका सिंगवर गुन्हाही नोंद झाला होता. त्यानंतर मिका सिंगला अटकपूर्व जामीन मिळाला होता.

या प्रकरणात आता मिका सिंग आणि राखी सावंत (rakhi sawant) यांच्यात तडजोड झालेली आहे. यानंतर मिका सिंगने त्याच्यावरील गुन्हा मागे घेतला जावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, आणि एस. जी. दिघे यांनी या प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

राखी सावंत हिच्या वकिलांनी मिका सिंगवरील गुन्हा मागे घेण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

मिका सिंग (mika singh) याच्यावतीन अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी बाजू मांडली. त्या म्हणाल्या, “मिका सिंग याच्यावर जे आरोप नोंदवले गेले त्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. मिका सिंग आणि राखी सावंत यांच्यातील वाद मिटला असून दोघेही आता चांगले मित्र आहेत.”

Back to top button