इंदापूर : राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाध्यक्ष गारटकर | पुढारी

इंदापूर : राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाध्यक्ष गारटकर

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्यासाठी एकसंघ राहून प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. शनिवारी (दि. 10) पुणे येथील धनकवडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन ध्वजारोहणासह विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनत, प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि पक्षवाढीच्या प्रसार आणि प्रचारातूनच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 वर्षांचा प्रवास करत इथपर्यंत पोहचला आहे. सर्वसामान्यांचा पक्षावर असलेला विश्वास हीच आपली खरी ताकद आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा बलशाली पक्ष करायचा आहे.

यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नूतन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबरोबर सर्वजण मिळून एकसंधपणे प्रयत्न करूयात. पक्षाचे आचार आणि विचार तळागाळापर्यंत रुजवून सर्वसामान्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवण्याचा प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, शिरूर हवेलीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुरंदर हवेलीचे तालुकाध्यक्ष भारत झांबरे, मुळशीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्रिंबक मोकाशी
यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

चिंचवडस्टेशन येथील पुलावरील एक मार्ग वाहतुकीस बंद

एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी

नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

Back to top button