पिंपरी : इंद्रायणीकाठी भक्तिरसात न्हाले वारकरी | पुढारी

पिंपरी : इंद्रायणीकाठी भक्तिरसात न्हाले वारकरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पालखी प्रस्थानानिमित्त देहूत आलेल्या हजारो भाविकांनी पवित्र इंद्रायणीत स्नान करून दर्शन घेतले. संपूर्ण दिवस इंद्रायणी घाट गजबजून गेला होता. वारकर्‍यांच्या प्रेमामुळे देहुनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. देहुत दाखल झालेले वारकरी भक्ति रसात चिंब झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर हातात पताका घेऊन पाण्याचे पूजन करण्यात आले. पूजन करताना वारकर्‍यांनी तुकोबारायांचा जयघोष करत; तसेच टाळमृदुंगाचा गजरात देहूत वारकर्‍यांनी फुगड्या घातल्या.

देहूत दाखल झालेल्या दिंडयांनी इंद्रायणीचा घाट वारकर्‍यांनी गजबजून गेला होता. अनेक भाविक इंद्रायणीचे मनोभावे दर्शन घेताना आढळून येत होते. तर काहींनी स्नान करण्याचा आणि पोहण्याचा लुटला. नदी घाटावर देखील एकामागोमाग एक दिंड्या येवून इंद्रयणी नदीचे दर्शन आणि पूजन करत होते. यानंतर टाळ मृदुगांच्या गजरात भजनाच्या सुराने घाटावर चैतन्य निर्माण झाले होते. स्नान केल्यानंतर घाटावर महिलांसाठी चेजिंग रुमची देखील व्यवस्था करण्यात आली होती. स्नान केल्यानंतर पुन्हा दिंड्यातील वारकरी विसाव्याला बसले होते. पायी चालून दमलेले वारकर्‍यांनी रस्त्याच्या कडेला सावली बघून वामकुक्षी घेताना आढळून येत होते. पुढच्या प्रवासासाठी पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी हजारो वारकर्‍यांनी इंद्रायणीत स्नानाचा लाभ घेतला.

हे ही वाचा : 

पुण्यात वारीच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; 6 वारकरी गंभीर जखमी

Ashadhi Wari 2023 : वारीची माहिती आता एका क्लिकवर; हे मोबाईल अ‍ॅप करा डाऊनलोड 

Back to top button