Ashadhi Wari 2023 : वारीची माहिती आता एका क्लिकवर; हे मोबाईल अ‍ॅप करा डाऊनलोड | पुढारी

Ashadhi Wari 2023 : वारीची माहिती आता एका क्लिकवर; हे मोबाईल अ‍ॅप करा डाऊनलोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीकरिता येणार्‍या वारकर्‍यांना वारीबाबतची आणि त्यांना आवश्यक सोयी-सुविधांची माहिती एका ’क्लिक’वर मिळणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ’आषाढी वारी 2023’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारीमध्ये सहभागी होणार्‍या भाविकांनी मोबाईल अ‍ॅप वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अ‍ॅपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची (लाइव्ह) सोय, पालखीचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा- त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टँकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरण, विद्युत सेवा, पशुधन आदी सेवेसाठी संबंधित अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

हरवलेल्या व्यक्तींचा घेता येणार शोध

पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांकदेखील या अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहेत. वारकर्‍यांसाठी गुगल प्ले स्टोअवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. एखादी व्यक्ती दिंडीमध्ये हरवली, तर ‘आपण यांना पाहिलंत का?’ या पर्यायाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा शोध घेता येणार आहे. वारकर्‍यांना होणार्‍या असुविधांबाबत या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारदेखील करता येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे
यांनी दिली.

व्यवस्थापनाची मिळणार माहिती

‘आषाढी वारी 2023’ हे अ‍ॅप वारकर्‍यांनी डाऊनलोड करून घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान काही अडचण, समस्या आल्यास या अ‍ॅपवरील संबंधित संपर्क अधिकारी, कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा. या अ‍ॅपद्वारे वारकर्‍यांना पालखीशी संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थापनाची माहिती घेता येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : वैष्णवांच्या सेवेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

आळंदी : माउलींच्या पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी लगबग

पुण्यात भिंतीवर साकारले श्री विठ्ठल यांंचे चित्र !

Back to top button