AUS v RSA : स्टोयनिसने अखेरच्या षटकापर्यंत गेलेला सामना चौकार मारुन दिला जिंकून | पुढारी

AUS v RSA : स्टोयनिसने अखेरच्या षटकापर्यंत गेलेला सामना चौकार मारुन दिला जिंकून

अबुधाबी : पुढारी ऑनलाईन

मार्कस स्टायनिसने अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( AUS v RSA )सामन्यात विजय मिळवून दिला. स्टायनिसने १६ चेंडूत नाबाद २४ धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचे ११९ धावांचे आव्हान १९.४ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने ३५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मॅक्सवेलने १८ तर मॅथ्यू वेडने १५ धावांची खेळी करुन विजयात योगदान दिले.  आफ्रिकेकडून नॉर्खियाने २ तर रबाडा, शामजी आणि महाराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेत ११९ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला.  सुपर १२ मधील पहिलाच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगल्याने यंदाच्या टी २० वर्ल्डकपची दमदार सुरुवात झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेले ११९ धावांचे माफक आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाची ( AUS v RSA ) सुरुवात देखील खराब झाली. दुसऱ्याच षटकात नॉर्खियाने कांगारूंचा कर्णधार फिंचला शुन्यावर बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने तीन चौकार मारत फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र रबाडाने त्याला १४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.

स्मिथ – मॅक्सवेलने डाव सावरला ( AUS v RSA )

त्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर केशव महाराजनेही ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्याने मिशेल मार्शला ११ धावांवर बाद करत कांगारुंची अवस्था ८ षटकात २ बाद ३८ धावा अशी केली. या पडझडीनंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १० व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

१० षटकानंतर स्मिथने आक्रमक पवित्रा घेतला होता. तर ग्लने मॅक्सवेल बॉल टू रन रणनीतीने खेळत होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ४२ धावांची भागीदारी रचत १४ षटकात ऑस्ट्रेलियाला ८० धावांवर पोहचवले होते. मात्र नॉर्खियाने ३४ चेंडूत ३५ धावा करणाऱ्या स्मिथला बाद करत ही जोडी फोडली.

स्मिथ बाद आणि सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला ( AUS v RSA )

क्रीजवर मार्कस स्टॉयनिस खेळण्यासाठी आला. आता ग्लेन मॅक्सवेल आणि स्टॉयनिससमोर ३० चेंडूत ३८ धावा करण्याचे आव्हान होते. मात्र चायनामन गोलंदाज तबरेज शामजीने मॅक्सवेलला १८ धावांवर बाद करत कांगारुंना मोठा धक्का दिला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड स्टॉयनिसची साथ देण्यासाठी मैदानात आला. त्याने रबाडा टाकत असलेल्या १७ व्या षटकात दोन चौकार मारत सामना १८ चेंडूत २५ धावा असा आणला.

दरम्यान, १८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने आपले शतक पार केले. आता त्यांना विजयासाठी १२ चेंडूत १८ धावांची गरज होती. दरम्यान, १९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नॉर्खियाच्या गोलंदाजीवर स्टायनिसला जीवनदान मिळाले. या षटकात स्टायनिस आणि वेडने मिळून ११ धावा केल्या. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती.

जीवनदान मिळालेल्या स्टायनिसचा विजयी चौकार ( AUS v RSA )

प्रोटेरियस टाकत असलेल्या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टायनिसने २ धावा घेतल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चौकार मारत सामना ४ चेंडूत २ धावा असा आवाक्यात आणला. प्रोटिरियसने तिसरा चेंडू निर्धाव टाकला. मात्र चौथ्या चेंडूवर स्टोयनिसने चौकार मारत सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये सुपर १२ मधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( AUS v RSA ) यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ९ बाद ११८ धावांवर थोपवले. वर्ल्डकप मधील द. आफ्रिकेची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूड, मिशेल स्टार्क आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून एडीन मॅर्कक्रमने सर्वाधिक ४० धावा केल्या.

फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दोन चौकार मारणाऱ्या टेम्बा बावूमाला ग्लेन मॅक्सवेलने आपल्या फिरकीत फसवले. त्यानंतर जॉस हेजलवूडने दक्षिण आफ्रिकेला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. पहिल्यांदा त्याने डुसेनला २ धावांवर तर क्विंटन डिकॉकला ७ धावांवर बाद करुन आफ्रिकेची अवस्था ४ षटकात २ बाद २३ अशी केली. त्यानंतर आलेल्या एडीम मार्कक्रम आणि  हेन्रिच क्लासनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

कांगारुंची फिरकी आणि तेज माराही अव्वल ( AUS v RSA )

मात्र कमिन्सने क्लासनला १३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला डेव्हिड मिलरही १३ धावांची भर घालून माघारी फिरला. त्याला झाम्पाने बाद केले. झाम्पाने पाठोपाठ ड्वेन प्रेटोरियसलाही १ धावेवर बाद करत आफ्रिकेची अवस्था ६ बाद ८२ अशी केली. त्यानंतर महाराज भोपळाही न फोडता माघारी गेला.

हेही वाचा : INDvsPAK : भारताला मात देणारे पाक खेळाडू होणार मालामाल, तरी टीम इंडियाची मॅच फीच तगडी

दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या मार्कक्रमने संघाला कसे बसे शंभरच्या जवळ पोहचवले. मात्र स्टार्कने त्याची ४० धावांची झुंजार खेळी संपवली. अखेरच्या षटकात नॉर्खियाही २ धावा करुन बाद झाला. त्यालाही स्टार्कनेच बाद केले. रबाडाने २३ चेंडूत नाबाद १९ धावांची खेळी करून संघाला २० षटकात ९ बाद ११८ धावांपर्यंत पोहचवले.

Back to top button