बारामती महाविद्यालयाला अहिल्यादेवींच्या नावामुळे नवीन उर्जा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल | पुढारी

बारामती महाविद्यालयाला अहिल्यादेवींच्या नावामुळे नवीन उर्जा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने सर्वांनाच नवीन उर्जा मिळणार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले. मंगळवारी (दि. ६) रोजी पटेल यांनी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आमदार राम शिंदे व अन्य मान्यवर त्यांच्यासोबत होते.
पटेल म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींची महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. त्यांच्या नावाने हे वैद्यकीय महाविद्यालय आता ओळखले जाईल. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेन. मी मध्यप्रदेशातील आहे. अहिल्यादेवींची महाराष्ट्र ही जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी मध्यप्रदेश आहे. सर्वांना समान न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. महिला सन्मानासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले. न्यायासाठी त्यांनी हातात तलवार घेतली. भगवान शंकरांच्या त्या भक्त होत्या. मुघल साम्राज्याने उद्धवस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्यांच्या नावाने हे महाविद्यालय ओळखले जाणे हे भाग्यशाली आहे.

बारामतीला आल्यावर अजित पवार स्वागत करतील

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र अद्याप स्वागत केलेले नाही. नामकऱण झाल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर ते नक्कीच या निर्णयाचे स्वागत करतील असा टोला आमदार राम शिंदे यांनी लगावला.
हेही वाचा

Back to top button