हिंगोली : तलवारीने केक कापून फेसबुकवर फोटो अपलोड करणे पडले महागात; कवठा येथील एकास अटक | पुढारी

हिंगोली : तलवारीने केक कापून फेसबुकवर फोटो अपलोड करणे पडले महागात; कवठा येथील एकास अटक

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील कवठा येथे वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून छायाचित्र फेसबुकवर अपलोड करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ४) अटक करून त्याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायद्यांतर्गत सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हयात मागील काही दिवसांपासून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी सोशल मिडीयावरील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. सोशल मिडीयावर अक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची तातडीने माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई केली जात आहे. मागील चार दिवसांत चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील कवठा येथील वैजनाथ अर्जुन अंभोरे या तरुणाने वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने तलवारीने केक कापून त्याचे छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील , पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे , ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने आज तातडीने कवठा येथे जाऊन त्या तरुणाची माहिती घेतली. त्यानंतर त्याला अटक करून त्याचाकडून तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान,जिल्हयातील नागरीकांनी विशेषतः तरुणांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकूनयेत. तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरे करून शस्त्राने केक कापू नये अशा तरुणांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस विभागाने दिला आहे.

Back to top button