दोन्ही काँग्रेस, ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता | पुढारी

दोन्ही काँग्रेस, ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभर अवकाश असला, तरी लढतीच्या तयारीचे वेध सुरू झाले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी जोर-बैठका काढायला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे घोडे जागावाटपावर अडखळण्याची चिन्हे आताच दिसत असल्याने आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात समझोता न झाल्यास लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता बोलली जात आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्षात 16-16-16 जागांचे समान वाटप व्हावे, असा एक साळसूद प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पुढे आला होता, अशी चर्चा आहे. त्याला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध केला होता. काँग्रेसने गतवेळी लोकसभेच्या 25 जागा लढवल्या होत्या. त्यांना 9 जागांचा फटका बसला असता, तर 23 जागा लढवणार्‍या शिवसेना ठाकरे गटाला सात जागा कमी मिळाल्या असत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागा लढवल्या होत्या. त्यांचा फारसा तोटा झाला नसता. हा सापळा लक्षात येताच काँग्रेस, ठाकरे गटाने हा प्रस्ताव धुडकावला.

या प्रस्तावानंतर ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे,’ या आपल्या धोरणानुसार पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा पुढे सरकावला आहे. खरे तर पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. गाडगीळ पिता-पुत्र, सुरेश कलमाडी अशी इथल्या विजयाची काँग्रेसची परंपरा. भाजपने ही जागा जिंकली, तरी काँग्रेसचे इथले नेटवर्क शाबूत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नुकताच दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क स्पष्ट झाला आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर डोळा ठेवलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अशाच रीतीने पायात पाय घालण्याची खेळी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘मविआ’तील जागावाटप कितपत सुरळीत होईल, याविषयी शंकेला जागा आहे. स्वाभाविकच, तिन्ही पक्षांना मैत्रीपूर्ण लढतींना सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नुकताच नेत्रदीपक विजय मिळवला. त्यामुळे पक्षातील मरगळ दूर झाली आहे. अलीकडेच कसबा विधानसभा मतदारसंघातील विजयाने काँग्रेस संघटनेत उत्साह निर्माण झाला आहे. बॅकफूटवर गेलेला काँग्रेस पक्ष फ्रंटफूटवर आला आहे आणि राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा लढवण्याचे स्वबळाचे वारे काँग्रेस पक्षात वाहत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ आहे, असे सांगत राष्ट्रवादीने अधिक जागांवर दावा केलाच होता. आता सर्व 48 जागांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत:च बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षाकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्याव्यात, यासाठी वेगवेगळे मुद्दे पुढे येत आहेत. मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवलेले उमेदवार आमचेच अधिक, असा युक्तिवाद केला जात आहे. येनकेनप्रकारेन जास्तीत जास्त जागा लढवता याव्यात, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा खटाटोप चालू आहे.

शिवसेनेनेही (ठाकरे गट) सर्वाधिक जागा आपल्या पक्षानेच जिंकण्याचा दाखला देत, जागावाटपामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात, यासाठी मोर्चेबांधणी केल्याचे दिसत आहे. बंडखोरीनंतर ठाकरे गटाला सहानुभूती मिळत आहे, शिंदे गटाच्या खासदारांना कट्टर शिवसैनिक माफ करणार नाहीत, असे गणित मांडण्यात शिवसेनेचे चाणक्य गर्क आहेत.

तिन्ही पक्षांची जागावाटपाबाबतची आक्रमक भूमिका लक्षात घेता, आघाडीत जागावाटपावर किती तडजोड होणार, हे सांगणे कठीणच आहे. त्यामुळे काही जागा परस्पर समजुतीने वाटल्या गेल्या, तरी वादग्रस्त जागांवर तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभारण्याची आणि मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढले आणि नंतर सत्तेसाठी एकत्र आले. हा फॉर्म्युला नेहमीच व्यवहारात आला आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या लढतीत हाच फॉर्म्युला अनेक ठिकाणी वापरला गेला. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांत लोकसभेला आणि पुढे विधानसभेला मैत्रीपूर्ण लढती झाल्यावर आश्चर्य वाटायला नको.

– सुरेश पवार

Back to top button