Wrestlers Protest | …तर भारतीय कुस्ती संघावर निलंबनाची कारवाई, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा इशारा | पुढारी

Wrestlers Protest | ...तर भारतीय कुस्ती संघावर निलंबनाची कारवाई, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिन्याभरापासून भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोन सुरु आहे. बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंना कुस्तीची सर्वोच्च संस्था असलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पाठिंबा दिला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने मंगळवारी एक निवेदन जारी करून दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याबद्दल निषेध केला. तसेच 45 दिवसांत WFI ची निवडणूक नाही झाली तर भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले जाईल, असा इशाराही दिला आहे. (Wrestlers Protest)

कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. विनेश, साक्षी आणि बजरंग यांच्यासह आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले होते. आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे म्हटले आहे. या सोबतच या प्रकरणी कुस्तीपटूंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक घेण्याची घोषणाही संघटनेने केली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे अध्यक्ष नेनाद लालोविक यांनी भारतीय कुस्ती संघाबाबतची माहिती गेल्या आठवड्यात मागवली होती. या पत्राच्या प्रती लालोविक यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा आणि इतर अधिकाऱ्यांनाही पाठवल्या होत्या.

दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शेतकरी नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हरिद्वार येथे ही पदके विसर्जित करण्यात येणार होती; परंतु आता हे कुस्तीपटू दिल्लीला परतले आहेत. त्यांनी आपली पदके नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. याबाबत बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले की, आंदोलक कुस्तीपटूंना ते काय करत आहेत हेच कळत नाही. दिल्ली पोलिस तपास करत आहेत. मी दोषी असल्यास मला अटक केली जाईल. कुस्तीपटूंचे आरोप खोटे असल्याचे बृजभूषण यांनी यापूर्वी म्हटले आहे. त्याने स्वतःसह कुस्तीपटूंची नार्को टेस्ट करण्याचे आव्हानही दिले होते. सध्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आखाड्यात उडी घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. (Wrestlers Protest)

हेही वाचा : 

Back to top button