यवतमाळ : प्रियकराकडून प्रियसीचा खून; २४ तासात पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात सोमवारी सकाळी तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाला गती दिली आणि २४ तासांच्या आत हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी (ता. वसमत) येथे जाऊन आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या. शंकेखोर प्रियकरानेच त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
विनोद रंगराव शितोळे (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे (वय २५) ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी फ्लॅटच्या दाराला बाहेरून कडी लावलेली होती. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडलेला आढळून आला. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. हा खूनच असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तपासात विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. खून करून तो गावाकडे पसार झाला. संशयित आरोपीचे नावही माहीत नसताना वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, त्यांचे सहकारी अमोल अन्नेवार, सागर सिडाम यांनी आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अधिक वाचा :