‘अलमट्टी’च्या यंत्रणेशी महापुराबाबत समन्वय ठेवा | पुढारी

‘अलमट्टी’च्या यंत्रणेशी महापुराबाबत समन्वय ठेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने सतर्क राहावे, कोल्हापूर-सांगली भागातील पुराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क आणि समन्वय राखावा. काळजीपूर्वक नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी यंत्रणांना दिल्या. संबंधित नोडल अधिकार्‍यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करावे, त्याचबरोबर आवश्यक त्या यंत्रणा राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागांचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी द़ृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

बचाव पथकांची सज्जता

यावेळी लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सर्वच पथकांकडे बोटी, उपकरणे अनुषंगिक गोष्टींची सज्जता असल्याची माहिती देण्यात आली.

प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या, एनडीआरएफ, एसडीआरएफशी संपर्क-समन्वय राखा, हवामान खात्याकडून दिल्या जाणार्‍या इशार्‍यांबाबत सतर्क राहा. जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्त्वावरही नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अहवालावर अवलंबून राहू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना…

* सर्व अधिकार्‍यांनी चोवीस तास फोन सुरू ठेवावेत.
* आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करा.
* आवश्यक अन्नधान्य तसेच औषधांच्या साठ्याबाबत संबंधित विभागांनी काळजी घ्यावी.
* स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा.
* सर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतील याची खात्री करा.
* वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने सतर्क राहावे.

आपत्कालीन सज्जता

18 : एनडीआरएफ पथके
7 : एसडीआरएफ पथके
10 : नौदलाची पथके
6 : तटरक्षक दल पथके
70 : हवाईदलाची
मिग हेलिकॉप्टर्स

Back to top button