पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित : खा. सुप्रिया सुळे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा. मात्र, अनेक वर्ष होऊनही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना कोणत्याही सुविधा अजून पुरवल्या गेलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

नऱ्हेसह पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट सर्वच गावे मूलभूत प्रश्नसाठी संघर्ष करत आहेत. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य, असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक हे त्यांना भेडसावणारे प्रश्न पारी टॉवर्स मधील सदस्यांनी मांडले. सुळे यांनी सर्वांना विश्वास दिला कि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर झाल्यास त्वरित नगरसेवक नेमून कामांना गती देता येईल, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, भुपेंद्र मोरे, भावना पाटील, स्वाती पोकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पारी टॉवर्समधील कमिटी सदस्य डॉ. सोमनाथ गिते, निरंजन माळवदकर, शरद शिंदे, प्राजक्ता रणदिवे, रोहन कौसले, गौरीहर अवधूत, दिनेश तांबे, रामचंद्र येलपुरे, अभिषेक कोल्लम, स्वप्नील घन, शुभंकर जोशी, दत्तात्रय पडार, प्रवीण कुमकर, अतुल यादव, प्रेम निकुंभ, प्रिती वाळवेकर, प्राजक्ता तट्टू तसेच पारी टॉवर्स सदस्य उपस्थित होते.

या वेळी सोसायटितील सदस्यांनी अनेक समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. नऱ्हेकडून धायरीला जाणाऱ्या रस्त्यावर खूप अतिक्रमण असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते, त्यासाठी रस्त्याचे अतिक्रमण हटवून रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. नऱ्हेकडून धायरी फाट्याकडे, तसेच नवले ब्रिज कडे जाणारा रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे तिथे देखील रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता आहे. पारी चौकात सीएनजी पंप असल्यामुळे तिथे नेहमी वाहनांची रहदारी सुरू राहते, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते, त्यामुळे त्या सीएनजी पंपाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे.

पारी चौकातून धायरीकडे जाताना पुढे कचरा प्रोसेसिंग युनिट आहे, तिथून खूपच जास्त दुर्गंधी येते आणि ते आरोग्यासाठी खूप घातक आहे, त्याचेही स्थलांतर व्हावे. नऱ्हेतील संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे, त्यावर ठोस उपाययोजना करावी, पारी टॉवर्स परिसरात जवळपास कोठेही बस स्टॉप नाही. तसेच पाऊस पडल्यानंतर पारी चौकात खूप जास्त पाणी साठते, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी काहीतरी उपाययोजना करावी, अशा मागण्या सोसायटीतील सदस्यांनी यावेळी केल्या.

Back to top button