कोंढवा : नालेसफाई कुठे दक्ष, कुठे दुर्लक्ष; भैरोबानाल्याचा वास कोंडलेला! | पुढारी

कोंढवा : नालेसफाई कुठे दक्ष, कुठे दुर्लक्ष; भैरोबानाल्याचा वास कोंडलेला!

कोंढवा(पुणे) पुढारी वृत्तसेवा; आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरासह उपनगरांच्या परिसरात ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी ही कामे समाधानकारक, तर काही ठिकाणी असमाधानकारक झाली आहेत. काही भागात अद्यापही ही कामे सुरू नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामेही अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे चित्र आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी अद्याप निविदा प्रक्रियाच पूर्ण झालेली नसल्याने पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईची कामे रखडली आहेत. दै.’पुढारी’ने याबाबतचा घेतलेला हा आढावा.

भैराबानाला परिसरात अतिक्रमणे झाल्याने त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे साफसफाईचे काम असमाधानकारक झाल्याचे नागरिकांनी सांगितले. नाल्यात राडारोडा पडून असून, केवळ जेसीबीच्या साहाय्याने पाण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे. यामुळे आगामी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भैरोबानाल्याचा उगम येवलेवाडीत झाला असून, नागरी वस्तीतून तो सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास करत मुळा-मुठा नदीला मिळतो. नाल्याच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे प्रवाहास अडथळा निर्माण झाल्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. तीन वर्षांपूर्वी या नाल्याला आलेल्या पुरात पाच लोकांना आपला जीव गमावावा लागला होता. गेल्या वर्षीही या नाल्याचे पाणी शांताई भाजी मंडईमध्ये शिरले होते. या पार्श्वभूमीवर या नाल्याची साफसफाई व्यवस्थित होणे गरजे होते.

मात्र, नाल्यात राडारोडा पडून असून, केवळ पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे. क्लोअर हिल्स उंड्रीकडील बाजूने येणारा ओढा नागरी वस्तीतून येतो. एनआयबीएम भागातील किमान 25 मोठ्या सोसायट्यांमधून तो वाहतो. या ओढ्यावरही अतिक्रमण झाल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत आहे. मात्र, अतिक्रमणांसह साफसफाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भैरोबानाला परिसरात वॉर्ड ऑफिसचे संरक्षक भिंतीचे काम सुरू होते, त्यामुळे साफसफाईचे काम थांबले आहे. नाल्याची पाहणी पात्रातील राडारोडा तातडीने काढण्यात येईल.

राजेंद्र जाधव,
अधिकारी, महापालिका

महापालिकेने भैरोबानाल्याची पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी साफसफाई असमाधानकारक केली आहे. या नाल्याला येणारा महापूर पाहाता प्रशासनाने पात्रातील राडारोडा काढून त्याचा प्रवाह मोकळा करून द्यावा. तसेच त्यांची रुंदी व खोलीही वाढवावी; अन्यथा पुन्हा नागरी वस्तीत पाणी शिरून हाहाकार उडेल.

नारायणराव लोणकर, रहिवासी, कोंढवा

Back to top button