‘एमएचटी सीईटी’च्या निकालाकडे लक्ष ! अन्य सीईटींचे निकाल जाहीर | पुढारी

‘एमएचटी सीईटी’च्या निकालाकडे लक्ष ! अन्य सीईटींचे निकाल जाहीर

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परंतु अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे एमएचटी सीईटीच्या निकालाकडे आता विद्यार्थी-पालकांचे डोळे लागले आहेत.

सीईटीसेलकडून सीईटींच्या निकालाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 14 सीईटींचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये विधी तीन, पाच वर्षे, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एमसीए, बीएड, एमएड, आर्किटेक्चर, डिझाईन आदी अभ्यासक्रमांच्या सीईटींचा समावेश आहे. तर 9 ते 21 मे कालावधीत पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपची एमएचटी सीईटी झाली. या सीईटीसाठी यंदा 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 13 हजार 732 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 19 हजार 302 विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 77 हजार 403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 25 हजार 645 विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीएम ग्रुपपेक्षा पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती. एकूण 44 हजार 954 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 12 जूनच्या आसपास एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहेे.

Back to top button