सातारच्या संग्रहालयात शिवकालीन खजिना | पुढारी

सातारच्या संग्रहालयात शिवकालीन खजिना

सातारा; विशाल गुजर :  राजधानीचा मान मिळवणाऱ्या ऐतिहासिक सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाची
इमारत उभी राहिली असून याठिकाणी शिवकालीन शस्त्रे व अत्यंत दुर्मीळ वस्तूंचा  खजिना पहायला मिळणार आहे. या संग्रहालयातील
अंतर्गत दालनांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. येत्या वर्षभरात ती कामे पूर्णत्वास येणार असून त्यानंतर अडीच हजारांहून अधिक ऐतिहासिक वस्तूंची दुर्मीळ पर्वणी इतिहासप्रेमींना भुरळ घालणार आहे.

साताऱ्यातील बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळ मैदानावर ६० गुंठे क्षेत्रात नव्या शिवाजी संग्रहालयाची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे काम काही वर्षे अनेकविध कारणास्तव रखडले होते. यानंतर कोरोना काळात इमारतीचा जम्बो कोव्हिड सेंटर म्हणून वापर केला गेला. संग्रहालयातील कॅफेट एरिया, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, तिकीट गृह, वाहन व्यवस्था, गटार व्यवस्था अशी कामे मार्गी लागली असून शस्त्र व वस्त्र दालन निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे.

शिवकालीन तलवारी, खंजीर, चिलखते अन् बरेच काही…..

छत्रपती शिवाजी संग्रहालयात शिवकालीन तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिंगाडा, संगिनी, पिस्तुले अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान विविध प्रकारच्या पगड्या, शेला यासह छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ संग्रहालयात पहावयास मिळणार आहे. गेल्याच वर्षी संग्रहालयाची इमारत पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वस्तू बंदिस्त…

मार्केट यार्ड येथे असलेली संग्रहालयाची जुनी इमारत वस्तू संवर्धनासाठी अपुरी पडत होती. त्यामुळे ऐतिहासिक नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन चित्रे अशा कित्येक वस्तू पाच दशकांहून अधिक काळ बंदिस्तच आहेत. केवळ २५ टक्के वस्तू इतिहासप्रेमींना पाहता येत होत्या. वर्षभरात संग्रहालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर सुमारे अडीच हजार वस्तु इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत.

संग्रहालयाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर सर्व ऐतिहासिक वस्तू पाहण्यास उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त किल्ल्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक प्रसंगाचे डायोरामा, थ्री डी लेझर शोचाही अनुभव इतिहासप्रेमींना घेता येणार आहे. वर्षभरात संग्रहालयाचे काम मार्गी लावण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे.

– प्रवीण शिंदे, छ. शिवाजी संग्रहालय अभिरक्ष

 

 

Back to top button