अकोला शहरातून साडे सात लाखांची ब्राऊन शुगर जप्त; एलसीबीची कारवाई | पुढारी

अकोला शहरातून साडे सात लाखांची ब्राऊन शुगर जप्त; एलसीबीची कारवाई

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोला शहरात मोठ्या प्रमाणात मादक द्रव्याचा साठा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख संतोष महल्ले यांना मिळाली. या आधारे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात एलसीबीच्या खबऱ्याकडून माहिती गोळा करण्यात येत होती. अखेर अकोट फाइल भागात ब्राऊन शुगर आल्याची माहिती मिळताच छापा टाकून तब्बल सात लाख 50 हजार रुपयांच्या ब्राऊन शुगरचा साठा बुधवारी (दि.२०) रात्री उशिरा जप्त करण्यात आला. अफजल खान खलील खान असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीच्या घराची झडती घेतली असता सात लाख पन्नास हजार रुपयाचा ब्राउन शुगरचा साठा लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी ब्राऊन शूगरचा साठा जप्त करून आरोपीस अटक केली. रस्त्याने तसेच राष्ट्रीय महामार्गावर चेक पोस्ट असताना ब्राऊन शुगर एवढ्या मोठ्या प्रमाणात अकोल्यात आला कसा ? रस्त्यावर वाहनांची तपासणी होत नाही काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, एलसीबीचे निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Back to top button