कोकणच्या शिक्षणाचा नवा पॅटर्न | पुढारी

कोकणच्या शिक्षणाचा नवा पॅटर्न

स्थापना झालेल्या वर्षापासूनच गेली 10 वर्षे म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक निकालाची परंपरा असलेल्या कोकण विभागाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या या निकालामुळे कोकणच्या शिक्षणाच्या पॅटर्नचा महाराष्ट्रभर गवगवा होत आहे. यावर्षीचा हा नवा विक्रम येथील शिक्षण पद्धतीच्या आदर्शवत आलेखाचा परिपाक आहे. दहा वर्षांपूर्वी लातूर पॅटर्नचा महाराष्ट्रभर गवगवा होता. सर्वाधिक निकाल देणारा पॅटर्न अशी लातूरची ओळख होती. मात्र, हा पॅटर्न मागे सारत कोकणने शिक्षणाचा नवा पॅटर्न तयार केला. नऊ विभागीय परीक्षा मंडळांमध्ये कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 96 टक्के एवढा आहे. त्या खालोखाल पुणे 93.34, कोल्हापूर 93.28, अमरावती 92.75, लातूर 90.37, नागपूर 90.35, छत्रपती संभाजीनगर 91.85, नाशिक 91.66 आणि मुंबई 88.13 असे यावर्षी लागलेले निकाल आहेत. यात सर्वाधिक निकाल हा पॅटर्न कोकण बोर्डाचा लागला आहे. या निकालामध्ये 100 पेक्षा जास्त शाळा या 100 टक्के निकाल देणार्‍या ठरल्या आहेत. योगायोगाने यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेसुद्धा कोकणातीलच आहेत आणि त्यांच्याच विभागाने सर्वोत्तम स्थान मिळवल्याने त्यांच्यासाठीही हा शुभ संकेत ठरला आहे. एका बाजूला कोकणातील ग्रामीण भागातील बोर्ड 96 टक्के निकाल लावते. त्यावेळी मुंबई बोर्ड मात्र 88 टक्के असा सर्वाधिक तळाचा निकाल लावते हा विरोधाभाससुद्धा तपासून पाहण्याची वेळ आली आहे.

कोकण बोर्डाचा लागलेला सर्वोत्तम निकाल हा कोकणातील शाळांच्या मेहनतीचे हे फळ आहे. दहावी, बारावीचा सर्वोत्तम निकाल लावण्याची परंपरा कायम ठेवताना सातत्यही यात कायम दिसून येत असल्याने हा पॅटर्न महाराष्ट्रभर मान्यताप्राप्त झाला आहे. खरं तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांमध्ये उत्तम शिक्षण मिळते, असा सार्वत्रिक समज आहे. कारण, या शहरांमध्ये मोठमोठ्या क्लासेसचेही मोठे प्रस्थ आहे. परंतु, कोकण पॅटर्नने याला छेद दिला आहे. कोकण बोर्ड ज्या जिल्ह्यांमध्ये आहे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे अतिग्रामीण म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांत वारेमाप पैसे भरून नामवंत क्लास संस्कृतीची परंपरा नाही. तरीही इथली मुले सर्वाधिक गुणवत्तेने पुढे येतात. यामागे शाळा आणि शिक्षक यांची मेहनत आहे. शाळेच्या नियमित शिक्षकांच्या मार्गदर्शनावरच आपले शिक्षण घेणारी ही मुले मेहनतीने यश संपादन करत आहेत. याचे कारण मुले आणि शिक्षक यांच्यामधील समन्वय आणि शाळांमध्ये निर्माण होत असलेले अभ्यासप्रिय शिक्षण, मुलांना असलेली शिस्त, अत्याधुनिक मोबाईल संस्कृतीपासून मुलांना दूर ठेवण्यात आलेले यश अशी अनेक कारणे सांगता येतील.

ग्रामीण भागात, तर 80 टक्के विद्यार्थी शाळेचे पाच तास सोडले तर शेतीच्या कामामध्ये व्यस्त असतात. अत्याधुनिक मोबाईल संस्कृती मात्र या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. याचा सकारात्मक परिणाम हा निकालाच्या निमित्ताने दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी या जिल्ह्यांचा निकाल हा तळाला असायचा. मात्र, दहा वर्षांत एवढा चमत्कार काय झाला, ज्यातून एवढे मोठे परिवर्तन झाले, याचा शोध आणि बोध घेतला, तर महाराष्ट्रभर हा पॅटर्न लागू करणे शक्य होईल. शिक्षणमंत्री या भागातील असल्यामुळे त्यांना हा पॅटर्न हा महाराष्ट्रभर पोहोचवणे शक्य आहे. एका बाजूला मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधील निकाल खाली आलेला आहे, तर ग्रामीण भागातील निकाल उंचावलेला आहे हा विरोधाभास का? याचेही उत्तर शिक्षण व्यवस्थेला शोधावे लागेल. नवीन शिक्षणाचा पॅटर्न या वर्षीपासून लागू होत आहे. या नव्या शैक्षणिक संक्रमणाच्या काळात तरी याचा अभ्यास करणे उचित ठरणारे आहे.

– शशिकांत सावंत

Back to top button