विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय चर्चा झाली नसल्याची नार्वेकरांची स्पष्टोक्ती | पुढारी

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय चर्चा झाली नसल्याची नार्वेकरांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षामध्ये महत्त्‍वाचा १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय घटनापीठाने विधानसभा अध्यक्षाकडे सोपावला आहे. या निकालानंतर पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.दरम्यान या भेटी दरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी राहुल नार्वेकर यांनी दैनिक पुढारी सोबत बोलताना दिली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक फ्रान्समधील मार्सेलिस किनारपट्टीवर उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयासोबत बोलणी सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्मारक उभारण्यासंदर्भात सकारात्मक असून, ते याचा पाठवपुरावा करीत असल्याने त्यांची भेट घेतल्याचे नार्वेकर म्हणाले.पंरतु, विद्यमान सरकारचे भवितव्य ठरवणारे आणि राज्यातील राजकारणाला नवीन वळण मिळेल असे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष या नात्याने नार्वेकर यांच्याकडे असल्याने या भेटीला मोठे महत्व आले आहे.

राजकीय चर्चा झाली नसल्याचे नार्वेकर म्हणत असले तरी सॉलिसटर जनरल तुषार मेहतांच्या भेटीमुळे चर्चांना पेव फुटले आहे. मेहता यांच्या सोबत वैयक्तिक संबंध आहेत.ही भेट वैयक्तिक होती, असे ते म्हणाले. मतदारसंघातील कामांसंबंधी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान शहा आणि मेहता यांची एकाच दिवशी भेट घेतल्याने नार्वेकर आमदार अपात्रते संदर्भात लवकरच निकाल देतील, अशी चर्चा राजधानीत रंगली आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button