Row over new Parliament building | नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, सुप्रीम कोर्टात याचिका | पुढारी

Row over new Parliament building | नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, सुप्रीम कोर्टात याचिका

पुढारी ऑनलाईन : नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे, असे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (Row over new Parliament building) सी. आर. जयासुकिन यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमास आमंत्रित न करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे, असा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे.

दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावयास हवे, असे सांगत काॅंग्रेससह १९ विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे. दुसरीकडे रालोआतील घटक पक्षांशिवाय चार प्रादेशिक पक्ष या कार्यक्रमात सामील होणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमास हजर राहणार असल्याची माहिती वायएसआर काॅंग्रेसचे नेते व आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या रविवारी (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेची जोड देण्याचा सुंदर प्रयत्न आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. २८ मे रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच उद्घाटन कार्यक्रमावर राजकारण न करण्याचे आवाहनही विरोधी पक्षांना त्यांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचेदेखील शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

दरम्यान, काँग्रेस, तृणमूल, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. हे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे आणि त्यानुसार आम्हीही तसेच ठरविल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिली.

काँग्रेसही बहिष्काराच्या तयारीत

काँग्रेसकडूनही बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने लवकरच एक संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. संसद भवनाच्या उद्घाटनास राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रित न करून सरकारने त्यांचा अवमान केला आहे. हा देशातील आदिवासींचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे खा. संजय सिंग यांनी व्यक्त केली.

लोकसभा व राज्यसभेबरोबर राष्ट्रपती हेही संसदेचे अविभाज्य भाग असतात. अशावेळी राष्ट्रपतींना उद्घाटनाचा मान न देणे घटनेच्या विरोधात आहे, असे मत भाकप नेते डी. राजा यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना न बोलावण्याच्या मुद्द्यावरून केंद्रावर सातत्याने टीका केली आहे.

ज्या दिवशी संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, त्या दिवशी सावरकर जयंती आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी झाला होता. यंदा त्यांची १४० वी जयंती साजरी केली जाणार आहे. याच दिवशी संसद भवनाचे उद्घाटन करणे हा निव्वळ योगायोग आहे की, हे सर्व सुनियोजित आहे, अशी टिपणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

‘या’ पक्षांनी घातला बहिष्कार

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेल्या पक्षांमध्ये राजद, संयुक्त जद, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप यांचा समावेश आहे. (Row over new Parliament building)

 हे ही वाचा :

Back to top button