पुणे : मी खुनाचा प्रयत्न, गोळीबार करणारा मोठा गुन्हेगार, असे म्हणत तरुणाला मारहाण | पुढारी

पुणे : मी खुनाचा प्रयत्न, गोळीबार करणारा मोठा गुन्हेगार, असे म्हणत तरुणाला मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ’मी खुनाचा प्रयत्न व गोळीबार करणारा मोठा गुन्हेगार असताना, तू मला टपरी फोडणारा चोर कसे काय म्हटला’, असे म्हणत सराईत गुन्हेगाराने पाच ते सहा साथीदारांना बरोबर घेऊन एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अब्दुल जैद हबिब अहमद खान (वय 19) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, वारजे पोलिसांनी राहुल विठ्ठल वांजळे (वय 24, रा. अहिरेगाव) याला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर, सराईत गुन्हेगार पपुल्या ऊर्फ दिग्विजय वाघमारे (वय 20) याच्यासह सहा जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विठ्ठल नगर वारजे येथील अजहर मूर्तजा खान (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मे रोजी न्यू अहिरेगाव, गणपती माथा, वारजे माळवाडी परिसरात घडली आहे.

याबाबत बोलताना, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे यांनी सांगितले, की आरोपी पपुल्या हा सराईत गुन्हेगार आहे. अब्दुल जैद हा पपुल्या याने टपरी फोडली, असे एकाजवळ म्हटले होते. त्याचा राग आल्याने पपुल्या याने आपल्या साथीदारांना बोलावून अब्दुल याला अहिरेगावातील एका इमारतीच्या छतावर घेऊन येणास सांगितले. ते त्याला तेथे घेऊन आले. त्या वेळी टोळक्याने अब्दुल याला जिवे ठार मारण्याच्या हेतूने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर नाचून डोके, पोटाला गंभीर जखमा केल्या. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

Back to top button