रत्नागिरीत पाणीप्रश्न बिकट | पुढारी

रत्नागिरीत पाणीप्रश्न बिकट

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  ‘घरात नाही पाणी … म्हणे शासन आपल्या दारी’, ’नगर पालिका हाय! हाय !’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या महिला सेलच्या वतीने सोमवारी रत्नागिरी पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी न.प.मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. अखेर पालिका मुख्याधिकार्‍यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात सध्या पाण्याची अवस्था बिकट होत चालली आहे.

पाण्याचे स्रोत आटत असून, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे तर पानवल धरणाचा पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे शहराची तहान आता शीळ धरणावर अवलंबून आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे येथील पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे न.प.ने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक दिवसाआड मिळणारे पाणी हेदेखील मुबलक मिळत नसल्याने काँग्रेसच्या वतीने पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अश्विनी आगाशे,
प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, सुष्मिता सुर्वे यांच्यासह दीपक राऊत, कपिल नागवेकर, साजिद पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी सर्व महिलांनी डोक्यावर हंडा कळशा घेऊन निदर्शने केली. मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांचा संताप वाढला होता. यावेळी महिलांनी नगर परिषदेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शासन आपल्या दारी या शासनाच्या ब्रीदवाक्यावर संतप्त महिलानी घोषणा दिल्या. ’घरात नाही पाणी, …म्हणे शासन आपल्या दारी’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आधी आम्हाला पाणी द्या, मग दारी या अशा प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्णय घेत मोर्चेकर्त्यांनी थेट नगर परिषदेमध्ये जावून मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी दिलेल्या घोषणांनी न.प.दणाणून गेला. दालनाबाहेर आंदोलक ठिय्या मांडून होते आणि दालनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाणी विभागाचे कर्मचारी मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा करीत बसले होते.

मुख्याधिकार्‍यांना विचारला जाब

यावेळी संतप्त महिलांनी मुख्याधिकार्‍यांना पाणीपुरवठ्यावरुन जाब विचारला. करोडो रुपयांची योजना राबवली मात्र 24 तास सोडा 1 तास देखील आपण मुबलक पाणी देऊ शकत नाही मग या योजना काय कामाच्या? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. यावेळी आंदोलकांनी नळाला येणारे अशुद्ध पाणी बाटलीत भरुन आणले होते. अस्वच्छ पाणी नळाला येत असल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले आहे हे पाणी तुम्हीच प्या, अशी मागणी आंदोलकांनी करताच मुख्याधिकारी सर्वांसमक्ष बाटलीतील पाणी प्यायलेही.

दहा दिवसांत गळती काढणार

यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आंदोलकांशी चर्चा करताना सांगितले की, काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी गळती आहेत. ती येत्या आठ ते दहा दिवसांत काढली जातील. त्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Back to top button