MI World Record: रोहितच्या नेतृत्वाखाली MIने टी-20 क्रिकेटमध्ये रचला विश्वविक्रम! | पुढारी

MI World Record: रोहितच्या नेतृत्वाखाली MIने टी-20 क्रिकेटमध्ये रचला विश्वविक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : MI World Record : आयपीएल 2023 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर आरसीबीचा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध 6 विकेट्सने पराभूत झाला, त्यामुळे मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला. दरम्यान हैदराबादवर विजय मिळवून एमआयने रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा विश्वविक्रम (MI World Record)

मुंबई इंडियन्स आणि सनरायडर्स हैदराबाद यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (दि. 21) खेळला गेला. पहिला फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईला विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर एमआयच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. रोहित शर्माने अर्धशतक तर कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक फटकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यासह, मुंबई संघ टी-20 स्पर्धेत एकाच मैदानावर सलग 5 सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला संघ बनला आहे. यापूर्वी आयपीएल 2016 मध्ये, RCB ने चिन्नास्वामी स्टेडियमवर चार वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर, लीड्समधील यॉर्कशायर आणि नॉर्थहॅम्प्टनमधील नॉर्थहॅम्प्टनशायर संघाने टी-20 ब्लास्ट 2022 मध्ये चार-चार वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (MI World Record)

मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 201, गुजरात टायटन्सविरुद्ध 218, आरसीबीविरुद्ध 200, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 214 आणि पंजाब किंग्जविरुद्ध 201 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने 6 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलमधील कोणत्याही संघाकडून एका हंगामातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे, ज्यांनी आयपीएलच्या एका हंगामात पाच वेळा 200 पेक्षा जास्त वेळा धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या संघाने आयपीएलमध्ये पाच वेळा 200 प्लस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून पंजाब किंग्जची बरोबरी केली आहे. पंजाबने 200 प्लसच्या लक्ष्याचा एकूण 5 वेळा यशस्वी पाठलाग केला आहे.

हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला

सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या. हैदराबादकडून वीरांत शर्माने 69 धावांची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने 83 धावांचे योगदान दिले. पण या फलंदाजांच्या मेहनतीवर त्यांच्या गोलंदाजांनी पाणी फिरवले आणि भरपूर धावा लुटल्या. उमरान मलिकने 3 षटकात 41 तर मयंक डागरने चार षटकांत 37 धावा दिल्या. मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने 100 धावा केल्या, रोहित शर्माने 56 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 25 धावांची खेळी केली.

Back to top button