IPL 2023 : नवीन-उल-हकची पुन्‍हा विराटला ‘खुन्‍नस’! ‘आरसीबी’च्‍या पराभवानंतर शेअर केले खिल्‍ली उडविणारे मीम | पुढारी

IPL 2023 : नवीन-उल-हकची पुन्‍हा विराटला 'खुन्‍नस'! 'आरसीबी'च्‍या पराभवानंतर शेअर केले खिल्‍ली उडविणारे मीम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी ( दि.२१) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्‍या (RCB) चाहत्यांना रविवारी मोठा धक्का बसला. गुजरात टायटन्सने आरसीबीचा संघाचा पराभव केला.रॉयल चॅलेंजर्सने विजय मिळवला असता तर ‘प्ले-ऑफ’मधील त्यांची जागा पक्की झाली असती; पण आरसीबीच्‍या पराभवाचा फायदा मुंबईला झाला. रोहित शर्माच्‍या नेतृत्त्‍वाखालील संघाने १६ गुणांसह ‘प्ले-ऑफ’मध्ये धडक मारली. (IPL 2023 )

रॉयल चॅलेंजर्स गुजरातविरुद्धचा सामना जिंकत दिमाखात ‘फ्‍ले-ऑफ’मध्‍ये धडक मारेल, असा अंदाज ‘आरसीबी’च्या चाहत्यांना होता. ‘आरसीबी’चा विजय झाला असता तर या संघाचा एलिमिनेटरमध्ये लखनौ संघाशी सामना झाला असता. चाहत्यांना विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर आणि नवीन उल हक पाहायला आवडले असते; पण तसे झाले नाही.रॉयल चॅलेंजर्सचे चाहते निराश झाले असताना, लखनऊच्या नवीन-उल-हकने बंगळुरूच्या पराभवानंतर त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक मजेदार मीम शेअर केला आहे.

नवीन-उल-हकने उडवली विराटची खिल्‍ली

नवीन-उल-हकने शेअर केलेल्‍या क्रिप्टिक पोस्टमध्ये एक व्यक्ती एकाच वेळी मोठ्याने हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्याच्या पोस्टवरून असे दिसते की तो कोहली आणि त्याच्या संघाची छेड काढत आहे आणि आरसीबीच्या पराभवाचा आनंद साजरा करत आहे. लखनऊ सुपर जायंट्सनेही आरसीबीची खिल्ली उडवली. एलएसजीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या हसताना दिसत आहेत. दोघेही आरसीबीच्या पराभवाचे सेलिब्रेशन करत मुंबई गाठताना दिसत आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये एलएसजीने लिहिले – मूड. यासोबत हँडशेकची इमोजीही टाकण्यात आली आहे. एलएसजी संघ आता 24 मे रोजी चेपॉक येथे एलिमिनेटरमध्ये मुंबईशी भिडणार आहे.

विराटशी वाद घातल्‍यानंतर नवीन-उल-हक आला होता चर्चेत

लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्‍यात ४ मे रोजी सामना झाला होता. या सामन्‍यावेळी नवीन-उल-हक हा विराट कोहलीशी भिडला होता. नवीन फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यात काही संवाद झाला. पंचांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण नवीन थांबत नव्हता. मॅचनंतर हे प्रकरण आणखी वाढले, हातवारे करत विराट आणि नवीनमध्ये बाचाबाची झाली. यानंतर प्रकरण इथेच संपले नाही तर नवीनमुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही वादावादी झाल्‍याचे पाहायला मिळाले होते. केएल राहुल आणि विराट कोहली बोलत होते, तेव्हा केएल राहुलला नवीन आणि विराटमधील प्रकरण मिटवायचे होते. नवीनला विराटला सॉरी म्हणायला सांगितले, तरीही तो आपल्‍याच मतावर ठाम राहिल्‍याचे दिसले. सामन्यानंतर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना दंड ठोठावण्यात आला होता. नवीनला 50 आणि गंभीर आणि विराटला 100-100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button