Rs 2000 Note : घरबसल्या बदला दोन हजार रुपयांची नोट, जाणून घ्या प्रक्रिया | पुढारी

Rs 2000 Note : घरबसल्या बदला दोन हजार रुपयांची नोट, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान, दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Rs 2000 Note Exchange at Home)

2016 मध्ये नोटबंदी

केंद्र सरकारने 2016 मध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यावेळी अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यातील 2 हजार रुपयाची नोट चलनातून काढून घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये आरबीआय कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या. (Rs 2000 Note Exchange at Home)

नोट बदलण्याची प्रक्रिया 23 मे 2023 पासून सुरू होणार

जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट जमा केली तर त्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु तुमच्या खात्याचे केवायसी (KYC) असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. बाजारात अन्य किमतीच्या नोटांचे पुरेसे प्रमाण आहे तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांचा दैनंदिन जीवनात फारसा वापर केला जात नाही, यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ठराविक मुदतीपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर जनतेला करता येणार आहे. लोकांनी बँकांत दोन हजार रुपयांची नोट जमा केल्यानंतर त्यांना तितक्याच किमतीच्या इतर चलनी नोटा दिल्या जातील. 23 मे पासून 30 सप्टेंबर पर्यंत जनतेला नोटा बदलून घेता येतील. एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. नोट बदलण्याची प्रक्रिया 23 मे 2023 पासून म्हणजेच सुरू होणार आहे. (Rs 2000 Note Exchange at Home)

नोटा कुठे बदलू शकतो?

तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच आरबीआयच्या 16 प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरबीआयने म्हटलं की, ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक दुर्गम भागात त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही.

घरात राहूनही 2 हजाराची नोट बदलता येणार? (Rs 2000 Note Exchange at Home)

नागरिकांना घरी बसूनही दोन हजाराची नोट बदलू घेता येणार आहे. जर बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्हाला घरी बसून नोटा बदलून घेता येतील. बँकमित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलून देतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्हाला 2000 रुपयांच्या दोन नोटा म्हणजे 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जातील.

2000 च्या बनावट नोटांचं काय होणार?

बँका नोट सॉर्टिंग मशिन्सद्वारे (एनएसएम) नोटांची तपासणी करणार आहेत. अशातच बँकेकडे कोणत्याही प्रकारे 2000 रुपयांची बनावट नोट आढळल्यास बँक ती जप्त करेल. त्या नोटेचे कोणतेही मूल्य ग्राहकाला दिले जाणार नाही. 4 पेक्षा जास्त बनावट नोटा आढळून आल्यास बँक अधिकारी त्या नोटा पोलिसांच्या ताब्यात देतील. पोलीस बनावट नोट प्रकरणाचा तपास करतील.

2000 रुपयांची नोट का बंद झाली?

2000 ची नोट आरबीआयने चलनातून बाद केल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे. या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्या. त्यांचे चलन बाकीच्या नोटांच्या तुलनेत कमी होते.

2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?

सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते मात्र 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा त्या बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण जर 2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, ग्राहकांनी पहिला संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेने 30 दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तकार नोंदवता येईल. (rbi news on 2000 rupee note)

Back to top button