

राजेंद्र कवडे-देशमुख
पुणे : केंद्र सरकारने दोन हजाराची नोट चलनातून बाहेर काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा ग्रामीण भागातील दैनंदिन आर्थिक व्यवहारावर काहीही झाला नसल्याचे चित्र दिसून आहे. ग्रामीण जनतेला या नोटेचे काही कौतुक नाही, असेच दिसत आहे. अनेक दुकानांमध्ये निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या दोन दिवसांत, दोन हजाराची एकही नोट आलेली नाही, फक्त प्रसिद्धी माध्यमांमध्येच या निर्णयाचा अधिक गवगवा होत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले.
खरे तर दोन-तीन वर्षांपासून व्यवहारात दोन हजाराच्या नोटा दिसून येत नव्हत्या, तसेच एटीएममधूनही दोन हजाराच्या नोटा चलनामध्ये फारशा येत नव्हत्या. त्यामुळे शासनाने दोन हजाराच्या नोटेची छपाई बंद केल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. तेव्हापासून ग्रामीण जनतेमध्ये दोन हजाराची नोट बंद होणार असल्याची चर्चा कायम चालू होती.
त्यामुळे आता रिझर्व बँकेने दोन हजाराची नोट 30 सप्टेंबरनंतर चलनातून काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय हा अजिबात धक्कादायक व अचानकपणे घेतलेला नसल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. दैनंदिन व्यवहारात आर्थिक देवाण-घेवाणीत अनेक वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा फारशा नसल्याने व सध्या बहुतेक नागरिकांकडे दोन हजाराच्या नोटा नसल्याने या निर्णयाचा फटका मोठ्या संख्येने जनतेला बसणार नाही, असे बोलले जात आहे.
तसेच ऑनलाईन व्यवहार वाढल्याने सर्वच नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. केंद्र सरकारने यापूर्वी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा फटका जनतेला मोठ्या प्रमाणावर बसला होता, मात्र कालच्या निर्णयाचा फारसा त्रासदायक परिणाम जनतेवर होणार नसल्याचे चित्र निदान ग्रामीण भागाततरी दिसून येत आहे. अनेक दुकानदारांशी चर्चा केली असता, निर्णय जाहीर होऊनही जनतेकडून खरेदीसाठी दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण अजिबात वाढलेले नाही, असे सांगण्यात आले.