अहमदनगर : इमामपूर, बहिरवाडी, मजले चिंचोलीतील डोंगराला वणवा..! | पुढारी

अहमदनगर : इमामपूर, बहिरवाडी, मजले चिंचोलीतील डोंगराला वणवा..!

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इमामपूर, बहिरवाडी तसेच मजले चिंचोली परिसरातील डोंगराला शनिवारी (दि.20) रात्री लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात वन विभागाला यश आले. इमामपूर तसेच बहिरवाडी परिसरातील चिमणा डोंगर, कडका डोंगर व मजले चिंचोलीच्या सोनदरा पट्ट्यात वणवा लागला होता. पठार तसेच दरीमध्ये वाळलेले मोठे गवत असल्याने वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक वृक्ष, पक्ष्यांची घरटे, खोफे, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे मोठे नुकसान झाले आहे. वणव्यामुळे वन्य प्राणी, पक्षी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत होते.
वन विभागाच्या वतीने वनपाल कृष्णा हिरे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक बाळासाहेब रणसिंग, वन कर्मचारी संजय सरोदे, अशोक पाटोळे यांच्या टीमने संपूर्ण रात्र वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रविवारी (दि.21) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वणवा आटोक्यात आणण्यात वन विभागाच्या टीमला यश मिळाले.
बहिरवाडी येथील सर्व्हे नंबर 1152, 1153 तर इमामपूर येथील सर्व्हे नंबर 1109 येथील क्षेत्राला वणव्याचा फटका बसला आहे. मजले चिंचोलीचा सोनदरा जळून खाक झाला आहे. रात्रीचा अंधार, खोल दरी, वाळलेले गवत अन् वारा यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. जेऊर येथील वनमित्र पथकातील सदस्य सनी गायकवाड, मायकल पाटोळे, शशिकांत पवार, संजय कोथिंबिरे यांनी वणवा विझविण्यासाठी वन विभागाला मोठे सहकार्य केले.  वनमित्र पथक व वन विभागाच्या टिमने वणवा आटोक्यात आणल्याने मोठी वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे.

रोपवन वाचविण्यात यश

बहिरोबा माळ परिसरातील रोपवन वाचविण्यात वन विभागाला यश आले आहे. या रोपवनात करंज, बाहवा, वावळा, लिंब, सीताफळ, शिसव, वड, पिंपळाच्या  सुमारे वीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. या क्षेत्रात वणव्याची आग गेली असती तर वनसंपदेचे अधिक प्रमाणात नुकसान झाले असते.

उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांची कार्यतत्परता

इमामपूर, बहिरवाडी परिसरातील वणव्याची माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांना समजल्यानंतर त्यांनी संपूर्ण रात्र वणवा विझविणार्‍या टीमच्या संपर्कात राहून मार्गदर्शन केले. वणव्याच्या परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत टिमला सूचना करत माने यांनी वणव्याबाबत कार्य तत्परता दाखवली.
शेतकर्‍यांनी बांध जाळू नयेत
शेतकर्‍यांनी डोंगराच्या कडेला आपल्या शेतीचे बांध जाळू नये. जेणेकरून डोंगराला वणवा लागेल. तसेच वनसंपदा असणार्‍या क्षेत्रात धूम्रपान करू नये. नागरिकांनी वनांचे जतन, संवर्धन करण्यासाठी काळजी घ्यावी.
                                                – सुवर्णा माने, उपवनसंरक्षक, अहमदनगर.

Back to top button