ठाणे : चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ…’ महाविकास आघाडीकडून या चर्चासत्राचे आयाेजन | पुढारी

ठाणे : चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ...' महाविकास आघाडीकडून या चर्चासत्राचे आयाेजन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आणि शिवसेना – भाजप युती विरुद्ध ठाकरे गट यांच्यात निकालाचे अर्थ सांगणारे दावे – प्रतिदावे युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून २३ मे रोजी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी “ चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ या..‘ या चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

या चर्चासत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्याचे सर्वप्रकारची अन्वयार्थ याबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे. त्याकडे पाहता, अंतिम निकाल येईपर्यंत हे सरकार घटनाबाह्यच आहे, ’ असा दावा यावेळी परांजपे यांनी केला.

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मंगळवारी 23 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे करणार आहेत. तर, खा. राजन विचारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या चर्चासत्रामध्ये न्यायालयाच्या आदेशाचे सर्व बारकावे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना समजवून सांगण्यात येणार आहेत, असे परांजपे यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या 141 पानांच्या निकालपत्राचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. श्रीकांत शिंदे हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. सध्या खोटे बोल पण रेटून बोल, अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. हा खोटेपणा उघडकीस आणण्याची सुरूवात ठाण्यातून करण्यात येत आहे. असे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या निरीक्षणाकडे पाहता, फुटीर गटाचा व्हीप बेकायदेशीर असल्याने मुख्यमंत्री ज्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्या सभागृहाचे त्यांचे सदस्य पदच सध्या प्रश्नांकित आहे. त्यामुळेच हे मुख्यमंत्री घटनाबाह्य ठरत आहेत. असे असतानाही या सरकारकडून खोटं बोलण्याचा रेटा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील खोटं बोलत असल्याने त्यांच्याबद्दल असलेला आदरही कमी होत असल्याचेही आनंद परांजपे यांनी म्हटले.

राज्यपालांच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंवरही परांजपे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे डॉक्‍टर आहेत. पण, त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे, हे आपणाला माहित नाही. त्यांनी निकालपत्र आधी अभ्यासावे त्यानंतर त्यावर बोलावे, असा टोलाही परांजपे यांनी लगावला.

विक्रांत चव्हाण यांनी, गोगावले यांचे प्रतोदपद बेकायदेशीर ठरविले आहे. त्यानुसार सुनील प्रभू हेच प्रतोद असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे गोगावले यांचे प्रतोदपद रद्द केल्याने त्यांच्या नियुक्तीनंतर झालेले सर्व निर्णय चुकीचे ठरत आहेत.

.हेही वाचा 

सरकारी कार्यालयाच्‍या तळघरात सापडलं ‘घबाड’, तब्‍बल दोन कोटींहून अधिक निनावी रोकड, १ किलो सोने जप्‍त; जयपूरमध्‍ये खळबळ

ठाणे महापालिकेच्या बसला आग ; १५ प्रवासी सुखरूप

सुरमणी मोहंम्मद अयाज सोलापूरचे ब्रँड ॲम्बेसिडर

Back to top button