सत्ताधारी आमदारांना किती निधी द्यायचा तो द्या, आमच्यावर अन्याय करू नका : अजित पवार | पुढारी

सत्ताधारी आमदारांना किती निधी द्यायचा तो द्या, आमच्यावर अन्याय करू नका : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘मागच्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात विरोधी आमदारांवर अन्याय झाला. आता असे करून चालणार नाही. तुम्हाला सत्ताधारी आमदार आणि स्वीकृत सदस्यांना किती निधी द्यायचा तो द्या. विरोधी आमदारांवर अन्याय करू नका,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देऊन चालणार नाही. आमच्या मतदारसंघात इतर सदस्यांनी सुचवलेली कामे मंजूर होतात. मी पालकमंत्री असताना असा भेदभाव कधी केला नव्हता,’ असे सांगून अजित पवार म्हणाले, ‘वढू आणि तुळापूर येथील 21 कोटी रुपयांच्या कामाला राज्य सरकारने स्थगिती दिली ती अद्याप उठवलेली नाही. या संदर्भात आपण पालकमंत्र्यांना सांगितले आहे.’

राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून, एक लाख 7 हजार कोटी रुपयांची बिले रखडली आहेत. अनेक कंत्राटदार आपल्याला भेटले. केलेल्या कामाची बिले मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. बिले का रोखण्यात आली याचं कारण सरकारकडून दिले जात नाही. याचा अर्थ राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. तर जिल्हास्तरावर तर वरती विचारल्याशिवाय बिले अदा करू नका, अशा सूचना मंत्रालयातून दिल्या असल्याचा आरोप पवार यांनी केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने बजरंगबलीला समोर ठेवून बटन दाबा, असे आवाहन केले; परंतु त्याला जनतेने प्रतिसाद दिला नाही. आता महाराष्ट्रात र्त्यंबकेश्वरपाठोपाठ आता तुळजापूरमध्येही समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. यामागे निश्चितच कोणीतरी मास्टरमाईंड आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, राज्यात जातीय सलोखा टिकावा यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करेल; परंतु धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत.

डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हा गुन्हा द्रुतगती न्यायालयापुढे चालवावा. चुकीचे काम करणार्‍याला माफी देता कामा नये. कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. समीर वानखेडे प्रकरणात त्या वेळी त्याची बाजू घेणारे आता बॅकफूटवर गेलेत. ते आता गप्प का? असा सवालदेखील पवार यांनी केला.

दहावीपर्यंत आम्हाला फुलपॅन्ट नव्हती

हाफपॅन्ट घातलेल्या मुलांना मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचं नाही, ही कुठली पद्धत? महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक धर्मांमध्ये प्रथा-परंपरा आहेत. तुळजापूरमध्ये सातवी-आठवीच्या मुलांना मंदिरात दर्शन घेण्यापासून रोखले असेल, तर ते चुकीचे आहे. अशी बंधने आणू नका. त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. मात्र, सध्याचे प्रकार बघता या महाराष्ट्राला पुन्हा फुले, शाहू, आंबेडकरांची गरज आहे. ते पुन्हा जन्माला आले पाहिजेत.

अरे बापरे! आता आमचे काही खरे नाही…

अशोक टेकावडे यांच्या भाजप प्रवेशावर ‘अरे बापरे, आता आमचे काही खरे नाही’ अशी प्रतिक्रिया देऊन पवार म्हणाले, ‘बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता मला जिवाचे रान करावे लागेल. त्यांना आम्हीच आमदार केले. ते माझे झाले म्हणून तुम्ही महत्त्व देता. बँकेचे चेअरमन केले, आमदार केले, काही प्रश्न आहेत. ते येथे सांगणे योग्य नाही. त्यांच्या गावात सरपंचपदावर त्यांचा माणूस करता आला नाही, म्हणून हे महाराज नाराज झाले आणि गेले. दिल्या घरी तू सुखी राहा.’

Back to top button