सोलापूरात एक किलो कांद्याचा दर फक्त चार रुपये | पुढारी

सोलापूरात एक किलो कांद्याचा दर फक्त चार रुपये

सोलापूर; संदीप गायकवाड :  येथील बाजार समितीत बळीराजाच्या कष्टाची अक्षरशः थट्टा मांडलीय. एक किलो कांद्यासाठी दर मिळतोय फक्त चार रुपये. या त्रासाला शेतकरी कंटाळले असून, आम्ही शेती करतो म्हणजे काय चूक करतो का, असा उद्विग्न सवाल कांदा उत्पादक शेतकर्‍याने आज बाजार समितीच्या आवारात केला.

सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरापासून हेच भयानक, दारुण चित्र आहे. येथील बाजार समितीत कांद्याला सरासरी चार रुपये प्रति किलो दर मिळत आहे. या कांदा विक्रीतून शेतकर्‍याच्या हातात दमडाही राहत नाही. तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकातून जर दमडाही उरत नसेल तर आम्ही शेती करतो म्हणजे काय चूक करतो का…? आमच्या भावना तुम्ही मुख्यमंत्री, अधिकार्‍यांपर्यंत कधी पोहोचवणार, असे प्रश्न येथील शेतकरी यंत्रणेला, माध्यम प्रतिनिधींना करत आहेत.

फेब्रुवारी व मार्च महिन्यातील विक्री झालेल्या कांद्याला शासनाने अनुदानाचा टेकू दिला. मात्र, त्यानंतर बाजारात आलेल्या कांद्याची माती होणे सुरूच आहे. चालू वर्ष कांदा उत्पादकांसाठी अत्यंत वाईट गेले आहे. डिसेंबरचा अपवाद वगळता कांद्याचे दर प्रति क्विंटल एक हजार रुपयांपर्यंतच रेंगाळत राहिले. फेब्रुवारीनंतर कांद्याच्या दरात आणखी घसरण झाली, ती अद्याप सुरू आहे.

सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी चारशे रुपये इतक्या निचांकी दराने विकला जात आहे. या कांदा विक्रीतून शेतकर्‍याच्या हातात दमडाही शिल्लक राहत नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत विक्री झालेल्या कांद्याला शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर करुन शेतकर्‍याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. आता उशिरा लागण झालेल्या रब्बी कांद्याच्या पिकाची आवक घटल्यानंतर कांदा बाजार सुधारणार, अशी शक्यता शेतीमाल बाजाराच्या अभ्यासकांनी व्यक्त केली होती. मात्र, मे पंधरवडा उलटला तरी कांदा बाजाराची घसरगुंडी सुरूच आहे.

अपवाद वगळता गेल्या पाच वर्षांपासून कांदा उत्पादकांची निराशा झाली आहे. सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे कांदा निर्यात घटली आहे, असा दावा केला जात आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचाही आरोप होत आहे.
यामुळे भविष्यात कांदा उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळण्याचा धोका आहे. असे झाल्यास सध्या उत्पादक शेतकरी ढाळत असलेले अश्रू भविष्यात ग्राहक ढाळताना दिसतील.

आवक वाढतेय अन् दर घसरतोय

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 261 ट्रक कांद्याची आवक झाली. या कांद्याला किमान 100, तर कमाल 1000 प्रति क्विंटल दर मिळाला. सरासरी दर हा प्रति क्विंटल 400 रुपये राहिला.

गेल्या चार वर्षांत कांदा उत्पादनातून हाती काहीच लागले नाही. येणार्‍या वर्षात काहीतरी हाती लागेल, याच अपेक्षेने कांदा उत्पादन करत राहिलो. मात्र, आता पर्यायी पिकाचा विचार करावा लागेल.
– ज्ञानेश्वर पाटील, कांदा उत्पादक शेतकरी

Back to top button